Nashik News | सातपूरला शांततेत मतदान, अनेक ठिकाणी लांबलचक रांगा

मीनाताई ठाकरे मनपा शाळेत मतदान करण्यासाठी झालेली नागरिकांची गर्दी.
मीनाताई ठाकरे मनपा शाळेत मतदान करण्यासाठी झालेली नागरिकांची गर्दी.
Published on
Updated on

सातपूर : पुढारी वृत्तसेवा- सातपूर औद्योगिक वसाहतीमध्ये लोकसभा निवडणुकीसाठी मतदान प्रक्रिया शांततेत पार पडली. महादेवनगरसह काही केंद्रांवर ईव्हीएम मशीनमध्ये बिघाड झाला होता. ईव्हीएम मशीन बदलून समस्या सोडवण्यात आली.

सातपूर परिसर हा कामगार वसाहतीचा असल्याने कामगारांनी सकाळी ७ ते ११ या वेळेत व दुपारी 3 नंतर मतदान करण्यासाठी मतदान केंद्रांवर गर्दी केली होती. त्यामुळे लांबच लांब रांगा दिसून येत होत्या. काही केंद्रांवर सावलीसाठी मंडपाची पुरेशी व्यवस्था नसल्याने मतदार उन्हाचे चटके, झळया सहन करत उभे असल्याचे दिसून आले. अनेक ठिकाणी लांबलचक रांगा असल्याने काही मतदार मतदान न करताच मागे फिरत असल्याचेही दिसून आले. काही मतदारांचे नाव मतदारयादीमधून डिलीट झाले होते. त्यामुळे मतदारांनी नाराजी व्यक्त केली.

मतदान प्रक्रियेस अनेक केंद्रांवर वेळ लागत असल्याने ताटकळत उभे असलेल्या नागरिक संताप व्यक्त करत होते. मतदारयादीमध्ये नाव शोधण्यासाठी मतदान केंद्रांबाहेर सहायता कक्ष उभारण्यात आले होते. मतदान केंद्रांवर सेल्फी पॉइंट उभारण्यात आले होते. त्याठिकाणी मतदार सेल्फी काढून वोट फॉर नाशिकची पोस्ट सोशल मीडियावर टाकून नागरिकांना मतदान करण्याचा संदेश देत असल्याचे दिसून आले. सातपूर औद्योगिक वसाहतीमधील कंपन्यांनी उत्पादन प्रक्रिया बंद न ठेवता, मतदान करण्यासाठी सोयीनुसार कामाच्या वेळेत सवलत दिली होती. ज्येष्ठ नागरिक आणि अपंगत्व असलेल्या मतदारांसाठी व्हीलचेअरची सुविधा मतदान केंद्रांवर करण्यात आली होती. सर्व केंद्रांवर पोलिस बंदोबस्त चोख असल्याचे दिसून आले.

हेहा वाचा –

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news