

नाशिक : गेल्या चार वर्षांपासून जागेच्या शोधात असलेल्या टिंकरींग लॅबला अखेर मुहूर्त लाभला आहे. टिंकरींग लॅबसाठी महापालिकेच्या महात्मा फुले कलादालनाची जागा निश्चित करण्यात आली आहे. जागेअभावी टिंकरींग लॅबचे २५ लाखांचे पुरक साहित्य वापराविना पडून होते.
टिंकरिंग लॅब ही केंद्र सरकारची एक योजना असून, याअंतर्गत शाळांमध्ये प्रयोगशाळा स्थापन केल्या जातात. टिंकरिंग लॅब अर्थात शोध प्रयोगशाळेत मुलांना विज्ञान, तंत्रज्ञान, अभियांत्रिकी आणि गणिते या विषयांवर आधारित विविध संकल्पना शिकायला मिळतात. या माध्यमातून मुलांमध्ये जिज्ञासा, सर्जनशीलता आणि संशोधक वृत्ती वाढीस लागावा, हा मुख्य उद्देश आहे. या प्रयोगशाळांमध्ये विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या गोष्टी बनविण्याची, नवीन कल्पनांवर काम करण्याची आणि त्या प्रत्यक्षात आणण्याची संधी मिळते. त्यानुसार रोबोटिक्स बनविणे, शिवणकाम, प्रिंटिंग, इलेक्ट्रॉनिक्स, कोडिंग यासारख्या गोष्टी शिकता येतात. मुलांना भविष्यातील तंत्रज्ञान आणि संशोधनासाठी तयार करणे हा देखील या टिंकरिंग लॅबमागील उद्देश आहे.
महापालिकेने या लॅबच्या माध्यमातून आपल्या मनपा शाळेतील इयत्ता सहावी ते दहावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना तंत्रज्ञान व संशोधनविषयक माहिती मिळावी याकरता 'वन अपोन' या संस्थेशी करारनामा देखील केला आहे. मात्र लॅबच सुरू न झाल्याने २५ लाखांचे साहित्य धुळखात पडून आहे.
टिंकरींग लॅबसाठी गेल्या चार वर्षांपासून जागेचा शोध सुरू होता. महात्मा फुले कलादालनाची जागा अतिरीक्त आयुक्त करिष्मा नायर यांनी निश्चित केली असून त्यावर आयुक्त मनिषा खत्री यांनी शिक्कामोर्तब केले आहे.
डॉ. मिता चौधरी, प्रशासनाधिकारी, नाशिक महानगरपालिका.
टिंकरींग लॅबसाठी आकाशवाणी टॉवर येथील सभागृह तसेच महात्मा फुले कलादालन या दोन जागांचा पर्याय पुढे आला होता. अतिरीक्त आयुक्त करिष्मा नायर यांनी महात्मा फुले कलादालनाच्या जागेची निश्चिती केली आहे.