

नाशिक : शहरात डेंग्यूचा प्रादुर्भाव वाढत असताना आणि प्रामुख्याने सिडको व सातपूर विभागात सर्वाधिक रुग्णसंख्या असताना या दोन्ही विभागांतील डास निर्मूलनाकरिता नेमण्यात आलेल्या पेस्ट कंट्रोलच्या ठेकेदाराने अद्यापही यंत्रसामग्री व अटी-शर्तीची पूर्तता केली नसल्याचे समोर आले आहे. त्यामुळे महापालिकेने या ठेकेदाराला दुसऱ्यांदा नोटीस बजावली आहे.
महापालिकेतील पेस्ट कंट्रोलचा ठेका कायम वादात राहिला आहे. सिडको व सातपूर विभागातील पेस्ट कंट्रोलच्या ठेक्याची मुदत ऑगस्ट २०१९ मध्ये संपुष्टात आल्यानंतर हा ठेका निविदा चक्रात अडकला. ऑक्टोबर २०२४ मध्ये या विभागांसाठी नवीन निविदा प्रक्रिया राबवून एप्रिल २०२४ मध्ये 'एस अॅण्ड आर पेस्ट कंट्रोल सर्व्हिसेस' या मक्तेदाराला काम देण्यात आले. निविदा अटीशर्तीनुसार जीपीएस यंत्रणेची अंमलबजावणी ठेकेदारावर बंधनकारक होती. त्याचबरोबर निविदा अटीशर्तीत अंतर्भूत यंत्रसामग्रीचा वापर अनिर्वाय असताना ठेकेदाराने जीपीएस यंत्रणेचा अवलंब केला नाही. निविदा अटीशर्तींचाही भंग केला. म्हणून महापालिकेच्या मलेरिया विभागाने ठेकेदारास नोटीस बजावली होती. यानंतर ठेकेदाराने कामकाजात सुधारणा करणे अपेक्षित असताना अधिकाऱ्यांच्या तपासणीत जैसे थे परिस्थिती आढळून आली. अर्थात ठेकेदाराने कोणतीही सुधारणा केली नसल्याचे आढळले. औषध फवारणी वेळेत होत नसल्याने डासांचा प्रादुर्भाव वाढल्याच्या तक्रारी वाढल्याने अखेर मलेरिया विभागाने एस ॲण्ड आर पेस्ट कंट्रोल या ठेकेदार कंपनीला दुसऱ्यांदा नोटीस पाठविण्यात येत असलल्याचे मुख्य आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. विजय देवकर यांनी सांगितले.
निविदा अटीशर्तींची पूर्तता न केल्याने ठेकेदाराला दंडात्मक कारवाई केली जाणार आहे. त्यानंतरही ठेकेदाराने कामकाजात सुधारणा न केल्यास निविदा अटीशर्तींचा भंग केल्याप्रकरणी सदर ठेका रद्द केला जाईल, अशी माहिती मुख्य आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. विजय देवकर यांनी दिली.