

नाशिक : जिल्ह्यात जादा क्षेत्र दाखवून अथवा पीक नसताना कागदोपत्री विमा उतरवण्याचा प्रकार उघडकीस आला होता. विमा कंपनीकडून तक्रार आल्यानंतर कृषी विभागाने पीक विमा उतरविलेल्या क्षेत्राच्या प्रत्यक्षात केलेल्या तपासणीत ही बनवाबनवी उघड झाली होती. यापूर्वी जिल्ह्यात कांदा पिकांचा बोगस पीक विमा उतरविण्यात आला असल्याचे समोर आले होते. त्यात आता फळबागांचाही समावेश झाला आहे.
जिल्ह्यात मृग बहरांतर्गत विमा योजनेत सहभाग घेऊन १,४६१.५० हेक्टर क्षेत्रावर फळ पीक विमा उतरविला आहे. यामध्ये ५०५ शेतकऱ्यांच्या १९९.५४ हेक्टर क्षेत्रावरील तफावत आढळली आहे. त्यापोटी ८ लाख ७१ हजार ९०० रुपयांची बचत झाली आहे. यामध्ये डाळिंब या पिकामध्ये जास्त तफावत आढळली असून, ४९३ शेतकऱ्यांच्या १९५.८० हेक्टर क्षेत्रावर तफावत आढळली आहे. जिल्ह्यात खरीप हंगाम २०२४ मध्ये शेतकऱ्यांनी उतरविलेल्या कांदा पीक विमा योजनेत बनवेगिरी झाल्याची तक्रार राज्य पातळीवरून कृषी आयुक्तालय पुणे आणि कृषी सचिव यांच्याकडे झाल्यानंतर कृषी अधिकाऱ्यांनी तपासणी केली. यातील बोगस असलेला विमा विभागाने रद्द केला. यापाठोपाठ फळबागा विमा आणि प्रत्यक्षात असणारे फळबागांचे लागवड क्षेत्र याची तपासणी कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी केली. मृग व आंबिया बहार योजनेंतर्गत २०२४-२५ व २०२५- २६ या आर्थिक वर्षात राज्यात ७३ हजार ७७७ शेतकऱ्यांनी सहभाग घेत ५० हजार ४४३ हेक्टरवरील फळबागा पीक विमा योजनेतून संरक्षित केल्या. त्यानुसार जिल्ह्यात कृषी विभागाने केलेल्या तपासणीत १ हजार ९७८ शेतक-यांनी १ हजार ४६१.८४ हेक्टरक्षेत्रावरील फळबाग नसतानाही विमा उतरविल्याचे सांगण्यात आले. यातील १ हजार ७४२ शेतक-यांचे १२६२ हेक्टर क्षेत्रावरील विमायोग्य असल्याचे आढळले आहे, तर २०५ शेतक-यांचे १२६.८७ हेक्टर क्षेत्रावरील विमा काढला नसल्याचे दिसून आले. २६९ शेतक-यांच्या ५२.९३ हेक्टर क्षेत्रावर लागवड क्षेत्रापेक्षा जास्त क्षेत्रावर विमा काढण्यात आल्याचे निर्देशनास आले.
५.६८ हेक्टर क्षेत्रावरील ८ शेतकऱ्यांचे वयापेक्षा कमी वयातील अर्ज असल्याचे निष्पन्न झाले, तर १४.०५ हेक्टर क्षेत्रावरील २३ शेतकऱ्यांनी दुसऱ्यांच्या नावावर विमा उतरविल्याचे दिसून आले. त्यामुळे एकूण ५०५ शेतकऱ्यांचे १९९.५४ हेक्टर क्षेत्रावरील तफावत आढळली आहे. या शेतकऱ्यांचा उतरविलेला विमा रद्द करण्यात आल्याची माहिती अकोले जिल्हा अधीक्षक कृषी कैलास शिरसाठ यांनी दिली.