

नाशिक : निखिल रोकडे
चित्रपट सृष्टीतील गाजलेल्या ‘शोले’ चित्रपटातील एक प्रसिद्ध डायलॉग आहे. 'इतना सन्नाटा क्यों है भाई?' सध्या हा डायलॉग नाशिक शहरातील गुन्हेगारी वतुर्ळावर अगदी अचूकपणे लागू होत आहे. गेल्या पाच दिवसांपासून पोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या नेतृत्वाखाली नाशिक शहरात गुन्हेगारीविरोधात कठोर कारवाई करण्यात येत आहे. या कारवाईमुळे भाईगिरी करणारे व त्यांच्या टोळक्यांचे अक्षरशः बिळात लपण्याचे दिवस आले आहेत. परिणामी, शहरात एक प्रकारचा शांततेचा, पण दहशतीने भरलेला 'सन्नाटा' पसरला आहे.
नाशिकची 'रात्रीची दहशत' सध्या तरी इतिहासजमा झाली आहे. नाशिकमध्ये वाढत्या गुन्हेगारीच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्थेबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित झाले होते. या स्थितीमुळे अगदी वरिष्ठ पातळीवरसुद्धा नाराजी व्यक्त झाली होती. मात्र, 'कायद्याचा बालेकिल्ला' या मोहिमेअंतर्गत सुरू करण्यात आलेल्या कडक कारवाईमुळे केवळ पाच दिवसांत शहरातील संपूर्ण वातावरण पालटले आहे. रात्री ९ नंतर नागरिकांना वाटणारी असुरक्षितता, ट्रिपल सीटने फिरणारे गुंड, चायनीज गाड्यांवरून दहशत माजवणारे टोळके, सोशल मीडियावर भाईगिरी करणाऱ्या रिल्सचा धुमाकूळ हे सर्व दृश्य आता दिसेनासं झालं आहे. केवळ आयुक्त कर्णिक यांनी काही ठराविक ठिकाणी प्रभावी कारवाई केल्यामुळेच हे शक्य झालं आहे. आज नाशिक हे भयमुक्त आणि सुरक्षित शहर बनत असल्याचं चित्र दिसून येत आहे. त्यामुळेच अनेक नागरिक शहरात रात्री फिरताना म्हणत आहेत ‘इतना सन्नाटा क्यों है भाई?’
नागरिकांचा पाठिंबा, पोलिसांचा आत्मविश्वास बळावला
या मोहिमेला सर्वसामान्य नागरिकांचा भरघोस पाठिंबा मिळत आहे. सोशल मीडियावर 'आय सपोर्ट पोलीस' या हॅशटॅगसह मोहीम जोर धरत आहे. काही नागरिकांनी तर स्वयंस्फूर्तीने शहरात 'नाशिक भयमुक्त झालं, गुन्हेगारीमुक्त झालं’ आम्ही पोलिस आणि प्रशासनासोबत आहोत' अशा आशयाची होर्डिंग्जही लावली आहेत. या जनसमर्थनामुळे पोलिसांचा आत्मविश्वास वाढला आहे आणि त्यांनी अशाच प्रकारच्या कारवाया सातत्याने सुरू ठेवण्याचा निर्धार केला आहे.
नाशिककरांच्या कायम लक्षात राहणारे पोलिस आयुक्त
सत्ताधारी पक्षांच्या विरोधातच इतक्या मोठ्या प्रमाणात व कठोर कारवाई करणारे संदीप कर्णिक हे नाशिकला लाभलेले पहिले पोलिस आयुक्त म्हणावे लागतील. नाशिक पोलिस आयुक्तालयाची स्थापना २८ नोव्हेंबर १९९० रोजी झाली. त्यानंतर अनेक आयुक्तांनी कार्यभार सांभाळला. मात्र, संदीप कर्णिक यांच्यापूर्वी व्ही. डी. मिश्रा, कुलवंत सरंगल आणि उपायुक्त स्वामी यांनीदेखील गुन्हेगारीविरोधात कठोर पावले उचलली होती. त्यावेळीही या अधिकाऱ्यांना नागरिकांचा मोठा पाठिंबा लाभला होता. त्यामुळे हे तीन अधिकारी नाशिककरांच्या कायम लक्षात राहिले आणि आता संदीप कर्णिक यांचे नावही या यादीत नक्कीच जोडले जाणार आहे.
भाजपात नव्याने प्रवेश केलेले झाले 'चिडीचूप'
अवैध धंदे, गुन्हेगारी पार्श्वभूमी, व्यवसायांना संरक्षण आणि कायद्याचा ससेमिरा टाळण्यासाठी अनेकांनी ‘उगवत्या सूर्याला सलाम’ करत भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. मात्र, भाजप व मित्रपक्षांतील वरिष्ठ पदाधिकाऱ्यांवर सुरू झालेली कठोर कारवाई पाहता, अनेक नव्याने प्रवेश केलेले नेते आता ‘सांगत येईना आणि सहन होइना’ अशा स्थितीत आहेत. त्यातच मुख्यमंत्री फडणवीस यांनीच ‘आम्हीच कारवाईचे आदेश दिल्याचे स्पष्ट केले आहे. त्यातच जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी देखील याबाबत स्पष्ट करताना गुन्हेगार ‘कोणत्याही पक्षाचा असो, त्याच्यावर कठोरच कारवाई झाली पाहिजे.’ असे सांगतले आहे. यामुळेच भाजपात प्रवेश केलेल्या गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या नेत्यांची फसगत झालेले सध्या तरी पाहावयास मिळत आहे.
‘याला उचललं, त्याला उचललं..’
शहरात सुरू असलेल्या गुन्हेगारीविरोधी मोहिमेमुळे नागरिकांमध्ये समाधान व्यक्त होत आहे. मात्र, ज्यांचा गुन्हेगारीशी संबंध आहे, ते सध्या भीतीखाली आहेत. सध्या चौका-चौकात ‘याला उचललं’, ‘त्याच्यावर गुन्हा दाखल’, ‘त्याला चोपलं’ अशा चर्चा रंगताना दिसत आहेत. अनेक गुन्हेगार, विशेषतः राजकीय पाठींबा असलेले, भूमिगत झाले आहेत. त्यांच्या कार्यकर्त्यांचा देखील पत्ता लागत नाही. त्यामुळे गुन्हेगारीला राजकीय किनारा असल्याचंही बोललं जात आहे.
‘मामा’चे पदही गेली आणि पतही!
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षात महानगरप्रमुखपद मिळताच भाजपमध्ये प्रवेश करणारे मामा राजवाडे यांची अवस्था आता ‘तेलही गेलं, तूपही गेलं’ अशी झाली आहे. शिवसेनेतून मिळालेलं पद गेलंच, पण पंचवटी परिसरात कार्यकर्त्यांच्या घोळक्यात फिरणाऱ्या आणि आका मानल्या जाणाऱ्या मामाला पोलिसांनी बालेकिल्ला मोहिमेंतर्गत अटक केली आणि दोऱ्या बांधून कोर्टात हजर केलं. यामुळे त्यांच्या कार्यकर्त्यांपुढे त्यांची पतही गेली आहे. पोलिसांनी अक्षरशः मामालाच मामा केलं