

ठळक मुद्दे
बाबासाहेब ऊर्फ मामा वाल्मीक राजवाडे व अमोल पाटील यांना १३ ऑक्टोंबरपर्यंत पोलिस कोठडी
सात संशयितांना ताब्यात घेण्यात आले असून, मुख्य सूत्रधार अजय बागुल अद्यापही पसार
मामा राजवाडे याची तब्बल दहा तास चौकशी केल्यानंतर शुक्रवारी (दि.10) अटक
नाशिक : रामवाडी ते विसे मळा मार्गावरील गोळाबार प्रकरणात अटक करण्यात आलेल्या संशयित बाबासाहेब ऊर्फ मामा वाल्मीक राजवाडे व अमोल पाटील यांना न्यायालयाने १३ ऑक्टोंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. शुक्रवारी (दि. १०) त्यांना न्यायालयात हजर करीत पोलिसांनी पाच दिवसांच्या कोठडीची मागणी केली. मात्र, बचाव पक्षाकडून झालेल्या युक्तीवादानंतर न्यायालयाने दोघांनाही चार दिवसांची पोलिस कोठडी सुनावली. दरम्यान, याप्रकरणी आतापर्यंत सात संशयितांना ताब्यात घेण्यात आले असून, मुख्य सूत्रधार अजय बागुल अद्यापही पसार आहे.
सुनील बागुल यांचा निकटवर्तीय असलेल्या व बागुल यांच्यासोबतच भाजपवासी झालेल्या मामा राजवाडे याची शहर गुन्हे शाखा युनिट एकच्या पथकाने तब्बल दहा तास चौकशी केल्यानंतर शुक्रवारी त्यास अटक करण्यात आली. त्याचबरोबर त्याचा समर्थक असलेल्या अमोल पाटील याला देखील गुन्हे शाखा युनिट एकच्या पथकाने ताब्यात घेतले. दोघांनाही मुख्य न्यायदंडाधिकारी बी. एस. इचपुराणी यांच्या न्यायालयात हजर केले होते. बचाव पक्षातर्फे ॲड. राहुल कासलीवाल व ॲड. मंदार भानोसे यांनी युक्तीवाद करताना पोलिस कोठडी न देता, न्यायालयीन कोठडी द्यावी अशी मागणी केली. तसेच ॲड. कासलीवाल यांनी संशयित राजवाडे यास पोलिसांनी मारहाण केल्याबाबतचा अर्ज सादर केल्याने, मुख्य न्यायदंडाधिकारी श्रीमती इचपुराणी यांनी पोलिसांना संशयित राजवाडे याची वैद्यकीय तपासणी केली जावी, याबाबतचे आदेश दिले. त्यानुसार, राजवाडे याची जिल्हा रुग्णालयात वैद्यकीय तपासणी केल्यानंतर त्याची रवानगी पोलिस कोठडीत करण्यात आली.
दरम्यान, सहाय्यक सरकारी अभियोक्ता शैलेंद्र बागडे यांनी, घटनास्थळाचे सीसीटीव्ही फुटेज उपलब्ध झाले असून, त्यात संशयित आरोपींचा सहभाग असल्याचे दिसून येत आहे. या प्रकरणात वापरलेले वाहन जप्त करण्यात आले आहे. तसेच याप्रकरणात वापरण्यात आलेले अग्निशस्त्र हस्तगत करणे बाकी असल्याने संशयितांच्या कोठडीची गरज असल्याचा युक्तीवाद केला.
पुन्हा 'कायद्याचा बालेकिल्ला'
सातपूर गोळीबार प्रकरणात लोंढे पिता- पुत्राचा 'नाशिक जिल्हा, कायद्याचा बालेकिल्ला' याबाबतचा व्हिडीओ समोर आल्यानंतर, समाज माध्यमावर तो मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला. त्यानंतर मामा राजवाडे आणि अमोल पाटील यांचा देखील 'नाशिक जिल्हा, कायद्याचा बालेकिल्ला' अशा घोषणा देतानाचा व्हिडीओ समोर आला. पोलिसांकडून सुरू असलेल्या धडाकेबाज कारवाईचे नाशिककरांकडून जोरदार स्वागत केले जात असून, वकील वर्गाकडून देखील या घोषणेचे स्वागत केल्याची सुप्त चर्चा न्यायालय आवारात दिसून आली.
सात अटकेत, मुख्य सूत्रधार पसार
गोळीबार प्रकरणी पोलिसांनी आतापर्यंत सात संशयितांच्या मुसक्या आवळल्या आहेत. त्यात सागर सुधाकर बागुल (रा. रामवाडी, पंचवटी), संदीप रघुनाथ शेळके (४३, रा. रामवाडी), गौरव सुधाकर बागुल (३६, रा. पंचवटी), प्रेमकुमार दत्तात्रेय काळे (३५), वैभव ऊर्फ विकी दत्तात्रेय काळे (२९, दोघेही रा. रामवाडी) आदी संशयितांना यापूर्वीच ताब्यात घेतले असून, त्यांना सोमवारपर्यंत (दि.१३) पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. त्यानंतर शुक्रवारी (दि. १०) मामा राजवाडे आणि अमोल पाटील या संशयितांच्या मुसक्या आवळल्यानंतर त्यांचीही सोमवारपर्यंत पोलिस कोठडीत रवानगी करण्यात आली आहे.
असे आहे प्रकरण
सचिन अरुण साळुंके (२८, रा. राणेनगर) याच्यावर गेल्या २९ सप्टेंबरला पहाटे विसे मळ्यात गावठी कट्ट्यातून गोळी झाडण्यात आली होती. त्यानंतर त्याचे अपहरण करीत त्यास जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला गेला. सरकारवाडा पोलिसांत सराईत गुन्हेगार तुकाराम चोथवे, अजय बोरिसा, अजय बागुल, पप्पू जाधव, सचिन कुमावत, बॉबी गोवर्धने, गोपाल दायमासह अज्ञात संशयितांविरोधात जीवे ठार मारण्याचा प्रयत्न करण्यासह विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.
गुंडाविरोधात पोलिस आक्रमक; गौरव बागुलला बेड्या
नाशिक : कॉलेजरोड येथील विसे मळ्यात झालेल्या गोळीबाराच्या घटनेमध्ये गौरव बागुल यास अटक करण्यात आली आता या प्रकरणांमध्ये अटक केलेल्या आरोपींची संख्या पाच झाली. गौरव बागुल यास न्यायालयाने १३ तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. या गुन्ह्यातील तुकाराम चोथवे, अजय बोरिसा, अजय बागुल, पप्पू जाधव, सचिन कुमावत, बॉबी गोवर्धने, गोपाल दायमा यांच्यासह अन्य आठ आरोपी फरार आहेत.
मामा राजवाडे, मनीष बागुलची चौकशी
सुनील बागुल यांचे समर्थक मामा राजवाडे व मनीष बागुल यांनाही गुन्हे शाखा युनिट क्रमांक एकच्या कार्यालयात यांचीही कॉलेज रोड व पंचवटी येथील झालेल्या गोळीबार प्रकरणात चौकशी सुरू आहे.
पवन पवार, विशाल पवार, विक्रम नागरे रडारवर
माजी प्रभाग सभापती पवन पवार व विशाल पवार यांच्या निवासस्थानीसुद्धा पोलीस उपायुक्त सहाय्यक, पोलीस उपायुक्त यांनी मोठा फौज फाटा घेऊन धाड टाकली व त्याच्या कार्यालय व घराची तपासणी केली मात्र ते दोघेही आढळुन आले नाही. विक्रम नागरे यांच्यावर अनधिकृत होर्डीग्जप्रकरणी सरकारवाडा पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला.