

नाशिक : विसे मळा आणि सातपूर गोळीबार प्रकरणी मुख्य सूत्रधार असलेले संशयित अजय बागुल आणि भूषण लोंढे हे अद्यापही पसारच आहेत. याशिवाय आक्षेपार्ह रिल्स आणि फलकाद्वारे दहशत निर्माण करण्याप्रकरणी गुन्हा दाखल असलेले माजी नगरसेवक पवन पवार व त्याचा भाऊ विशाल पवार, तसेच विना परवानगी फलक लावल्याप्रकरणी पोलिसांना हवे असलेले माजी नगरसेवक योगेश शेवरे व विक्रम नागरे हे अद्यापही पसारच आहेत. यांच्या शोधासाठी पोलिस पथके रवाना करण्यात आली असून, मुंबईसह परराज्यात त्यांचा शोध घेतला जात आहे.
गुन्हेगारीचे मूळ असलेल्या राजकीय गुंडांच्या मुसक्या आवळण्यासाठी पोलिसांनी कंबर कसली असून, दुसऱ्या दिवशी देखील 'नाशिक जिल्हा, गुन्हेगारीचा बालेकिल्ला' या घोषणा नाशिककरांच्या कानी पडल्या. लोंढे पिता-पुूत्राच्या मुसक्या आवळल्यानंतर, सुनील बागुल यांचा निकटवर्तीय असलेल्या मामा राजवाडे यास पोलिसांनी बेड्या ठोकल्या. दरम्यान, पोलिसांनी गुन्हे दाखल केलेले प्रमुख संशयित अद्यापही पसार असल्याने, त्यांच्या मुसक्या आवळण्याचे मोठे आव्हान पोलिसांसमोर आहे. रामवाडी ते विसे मळा मार्गावरील गोळीबार प्रकरणातील मुख्य सूत्रधार अजय बागुलला पकडण्यासाठी पथके रवाना करण्यात आली आहेत. तसेच सातपूर, आयटीआय सिग्नलवरील एका बारमध्ये केलेल्या गोळीबारात सराईत गुन्हेगार भूषण लोंढे हा मुख्य संशयित आरोपी असून, त्याचा देखील पोलिसांकडून शोध घेतला जात आहे.
याशिवाय, सराईत गुन्हेगार पवन पवार, योगेश शेवरे, विक्रम नागरे यांचा देखील पोलिस पथकांकडून शोध घेतला जात आहे. दरम्यान, संशयित आरोपी मुंबईसह परराज्यात पसार झाल्याचा पोलिसांना संशय असून, त्यादृष्टीने तांत्रिक विश्लेषणाद्वारे शोध घेतला जात आहे.
ऑपरेशन क्लिनअप
राजकीय गुन्हेगारांविरोधात मोर्चा काढत पोलिसांनी 'ऑपरेशन क्लिनअप' सुरू केले आहे. पोलिसांच्या या ऑपरेशनचे सर्व स्तरातून कौतुक केले जात असून, गुन्हा दाखल असलेल्या सर्व सराईत गुन्हेगारांच्या त्वरीत मुसक्या आवळण्याची मागणी नाशिककरांकडून केली जात आहे.
दीक्षा लोंढेंवरही गुन्हा दाखल
अवैधरित्या बॅनरबाजी करीत, नागरिकांमध्ये दहशत निर्माण करण्याप्रकरणी माजी नगरसेविका दीक्षा लोंढे यांच्याविरोधातही सातपूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांच्या या धडाकेबाज कारवाईनंतर शहरातील अवैध बॅनर अचानक गायब झाले असल्याने, नाशिककरांमध्ये समाधान व्यक्त केले जात आहे.
पररराज्यात फार्महाऊस
गुन्हे दाखल असलेल्या संशयित सराईत गुन्हेगारांचे परराज्यात फार्महाऊस असल्याचा पोलिसांना संशय असून, याठिकाणी काही संशयित आरोपी लपून बसल्याचा पोलिसांना संशय आहे. त्यादृष्टीने माहिती प्राप्त करून पोलिसांकडून तपास केला जात आहे. लवकरच सर्व पाहिजे असलेल्या संशयित आरोपींच्या मुसक्या आवळणार असल्याचा विश्वास पोलिसांकडून व्यक्त करण्यात आला आहे.