

नाशिक : मनमाड बाजार समितीत विद्यमान सभापतींविरोधात असंतोषाचा भडका उडाला असून त्यांच्यावर अविश्वास ठराव दाखल करून नव्या सभापतींची निवड करावी, यासाठी तब्बल 12 संचालकांनी जिल्हा उपनिबंधकांच्या उपस्थितीत प्रभारी जिल्हाधिकारी बाबासाहेब पारधे यांच्याकडे निवेदन सादर केले. यासंदर्भात लवकरच अविश्वास ठरावाची बैठक बोलावणार असल्याचे आश्वासन पारधे यांनी दिले.
मनमाड बाजार समितीच्या राजकारणात अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ आणि शिंदेसेनेचे आमदार सुहास कांदे यांच्या गटात यापुर्वी वाद सुरू होता. त्यातच विद्यमान अध्यक्ष आणि काही सदस्य भुजबळ यांच्या गटात होते. त्यातीलच काहींनी समितीचे सभापती दीपक गोगड यांच्या विरोधात अविश्वास दाखवत कांदे गटात प्रवेश केला होता. त्यानंतर भुजबळ गटातील सदस्यांनीही भाजपमध्ये प्रवेश केला.
दरम्यान सत्ताधारी गटातील काही सदस्यांनी विरोधी गटात प्रवेश केल्यामुळे अल्पमतात आलेल्या गोगड यांचे अधिकार काढण्याची मागणी प्रभारी जिल्हाधिकारी पारधे यांच्याकडे करण्यात आली. तत्पुर्वी हीच तक्रार उपनिबंधकांकडे करण्यात आल्यानंतर त्यावर काहीच कार्यवाही न झाल्याचे सांगत उपस्थित 12 सदस्यांनी गोगड याच्याविरोधात त्वरीत अविश्वास ठरावाची बैठक बोलावण्याची मागणी केली आहे.
गोगड संचालकांना विश्वासात न घेता मनमानी कारभार करीत असून ज्या सचिवांनी नियमबाह्य कामकाज करण्यास नकार दिला त्या सचिवांना कामावरून कमी करण्यात आले. तसेच सहा महिन्यांपासून बैठक घेतली नसून हमाल मापार्यांच्या लायसनवर निर्णय घेतला जात नसल्याचा आरोपही करण्यात आला आहे.