

मनमाड : मनमाड कृषी उत्पन्न बाजार समितीत गेल्या काही महिन्यांपासून सुरू असलेला सत्तासंघर्ष काही संपण्याचे नाव घेताना दिसत नाही. अल्पमतातील सभापती दीपक गोगड यांनी कोणतेही औचित्य नसताना सोमवारी (दि. २१) आनलाइन सभा आयोजित केली होती. नैसर्गिक आपत्ती नसताना अशाप्रकारे आनलाइन सभा घेण्याचे कारण काय आणि स्वत: सभापती सभागृहात का येत नाहीत, असे एक ना अनेक प्रश्न उपस्थित करत विरोधकांनी आक्रमक भूमिका घेतली. त्यामुळे उडालेल्या गोंधळाने ही सभा काही मिनिटांतच रद्द करण्यात आली.
तीन दिवसांपूर्वीच पणन संचालकांच्या आदेशानुसार बाजार समितीची सर्वसाधारण सभा घेण्यात आलेली असतानाही पुन्हा झूम मीटिंग घेण्यात येत असल्यामुळे विरोधी गटाने आक्षेप घेतला. सभेला एकूण १८ पैकी विरोधी गटाचे गंगाधर बिडगर, किशोर लहाने, कैलास भाबड, विठ्ठल आहेर, चंद्रकला पाटील, सुभाष उगले, अप्पा कुनगर, दशरथ लहिरे, संगीता कराड, मधुकर उगले हे सभागृहात, तर संजय पवार ऑनलाइन उपस्थित होते. सत्ताधारी गटाचे सभापती गोगडसह गणेश धात्रक, पुंजाराम आहेर, आनंदा मार्कंड, रूपेश लालवाणी अशा पाच संचालकांनी ऑनलाइन उपस्थिती लावली.
कोणतीही नैसर्गिक आपत्ती नसताना आणि सर्व सदस्य उपस्थित राहण्यास सक्षम असताना ऑनलाइन बैठक घेणे बेकायदेशीर असल्याचा आरोप करत विरोधी संचालकांनी गोंधळ घातला. शिवाय, अजेंड्यावरील सर्व विषयांना विरोध दर्शवण्यात आला. गोंधळ वाढल्यानंतर अखेर सभापती गोगड हे झूम मीटिंगमधून बाहेर पडले अन् सभा रद्द झाली.
मागील पाच महिन्यांपासून बाजार समितीमध्ये सत्ताधारी आणि विरोधी गटात संघर्ष सुरू असून, यामुळे समितीची नियमित सभा होऊ शकलेली नव्हती. हे प्रकरण जिल्हा उपनिबंधक, उच्च न्यायालय व पणन संचालक कार्यालयापर्यंत गेले होते. नुकतीच १५ जुलै रोजी पणन संचालकांच्या आदेशानुसार झालेल्या सभेत गंगाधर बिडगर यांच्या अध्यक्षतेखाली विषयसूचीत असलेले सर्व ठराव मंजूर करण्यात आले होते. मात्र सभापती गोगड यांनी ती सभा बेकायदेशीर ठरवत पुन्हा आज झूम मीटिंग बोलावली होती. या सर्व घडामोडींमुळे बाजार समितीत सत्तांतराचे चित्र निर्माण झाले आहे. आमदार सुहास कांदे गटाकडे आता १८ पैकी १२ सदस्य असल्यामुळे लवकरच सभापती गोगड यांच्याविरोधात अविश्वास ठराव दाखल होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.