

प्रदूषण तसेच इंधन वाचविण्याच्या दृष्टीने गेल्या वर्षापासून जिल्ह्यात सुरू करण्यात आलेल्या शिवाई या इलेक्ट्रॉनिक बसच्या माध्यमातून नाशिक आगाराला ६ कोटींचा फायदा झाला आहे. मात्र, सध्या कार्यरत असलेल्या मर्यादित ई- शिवाई बसेस वाढविणे, जुन्या झालेल्या साध्या बसेसच्या जागेवर या बसेस आणणे आणि त्यांची नियमित देखभाल दुरुस्ती करणे हे प्रमुख आव्हान महामंडळासमोर असणार आहे.
सात वर्षांपूर्वी शिवशाही बस महामंडळाच्या सेवेत समाविष्ट करण्यात आली, त्यानंतर राज्यात दिवसेंदिवस इंधनाचे वाढते दर, वाहनांमुळे वाढणारे प्रदूषण रोखण्यासाठी तसेच प्रवाशांना चांगली सेवा उपलब्ध करून देण्याच्या हेतूने एसटीच्या ताफ्यात विद्युत प्रणालीवर धावणाऱ्या इलेक्ट्रिक बस दाखल करण्याचा निर्णय घेतला गेला. राज्याच्या इलेक्ट्रिक बस धोरणानुसार एसटीने गेल्यावर्षी 1 जून रोजी एसटीच्या वर्धापन दिनाच्या मुहूर्तावर 'शिवाई' या इलेक्ट्रिक बसचे लोकार्पण केले. संपूर्ण राज्यात पहिल्या टप्प्यात १५० 'शिवाई' बसगाड्या भाडेतत्त्वावर घेतल्या गेल्या. या अनुषंगाने गेल्या वर्षीपासून नाशिक आगारात टप्प्या टप्प्याने २५ शिवाई बसेस सुरू करण्यात आल्या आहेत. त्यापैकी नाशिक-पुणे मार्गावर सर्वाधिक १० बसेसचे नियोजन करण्यात आले आहे.
ई-बस प्रदूषण विरहित, पर्यावरण पूरक, वातानुकुलित व आवाज विरहित आहेत. बसला आकर्षक रंगसंगतीमध्ये 'शिवाई' असे नाव देण्यात आले आहे. या बसची लांबी 12 मीटर असून टू बाय टू आसन व्यवस्था आहे. यामध्ये एकूण 43 आसने आहे. ध्वनी व प्रदुषणविरहीत तसेच वातानुकूलीत गाडी तसेच गाडी ताशी 80 किमी वेगाने ही गाडी रस्त्यांवर धावणार आहे. या बसची बॅटरी क्षमता 322 के.व्ही. इतकी आहे.
प्रदुषणमुक्त प्रवास आणि इंधनावरील खर्च कमी करण्यासाठी एसटी महामंडळाची विजेवर चालणारी वातानुकूलिक शिवाई रस्त्यावर धावतांना आवाज नसल्याने ध्वनीप्रदूषण नाही. अपंगांसाठी वेगळा रँप आहे. जीपीएस यंत्रणा कार्यान्वित, आपत्कालीन सुचनेसाठी बटनांची व्यवस्था, सीसीटीव्ही कॅमेरा यासह अन्य सुविधा आहेत. बस एकदा चार्ज केल्यानंतर २५० कि.मी. पर्यंत धाऊ शकते.
मार्ग : नाशिक पुणे
फेऱ्या : अठरा
अंतर : २१३ किमी
एकूण फेऱ्या : ४ हजार ८१८
एकूण किमी : १० लाख २५ हजार २७०
उत्पन्न : ५ कोटी ९४ लाख ४६ हजार ३०७