नाशिक : पुढारी वृत्तसेवा – दिंडोरी लोकसभा मतदारसंघाचे नवनिर्वाचित खासदार भास्कर भगरे यांनी बुधवारपासून (दि.५) कामाचा श्रीगणेशा केला आहे. निफाड तालुक्यातील शिरसगाव येथील सुखोई विमान दुघर्टनाग्रस्त भागातील त्यांनी पाहणी केली. त्यानंतर मतदारसंघातील नागरिक, महाविकास आघाडीचे पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्याशी संवाद साधला.
दिंडोरी मतदारसंघाची मंगळवारी (दि.४) मतमोजणी झाली. यावेळी भगरे यांनी तब्बल एक लाख १३ हजार १९९ मताधिक्याने केंद्रीय राज्यमंत्री भारती पवार यांचा पराभव केला. या निकालाने जायंट किलर अशी सर्वत्र ओळख लाभलेल्या भगरे यांनी त्यांचा साधेपणा कायम ठेवला आहे. खासदारपदी निवड झालेल्या भगरे यांच्या घरी सकाळी सत्कारासाठी कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांनी गर्दी केली. सत्कार सोहळे स्विकारल्यानंतर भगरे यांनी थेट शिरसगाव गाठत सुखोई दुर्घटनेची पाहाणी केली. यावेळी बाधित शेतकऱ्यांची व्यथा समजून घेताना जिल्हाधिकारी जलज शर्मा यांच्याशी संपर्क साधत तात्काळ मदतीसाठीच्या सूचना केल्या.
दरम्यान, शिरसगावच्या दौऱ्यानंतर ओझर येथे एका अंत्यविधीला ते उपस्थित राहिले. दरम्यान, भगरेनी यांनी पहिल्या दिवसापासून त्यांच्या कामाची चुणूक दाखवायला सुरवात केली आहे. येत्या काळात कांदाप्रश्न, शेतकऱ्यांच्या समस्या, दिंडोरी मतदारसंघातील रखडलेले प्रकल्प, रेल्वेच्या समस्या तसेच अन्य आव्हाने सोडविण्यासाठी भगरे यांना अधिक सक्रीय व्हावे लागणार आहे.
हेही वाचा: