Nashik News : मनसेने इंग्रजी पाट्यांना फासले काळे

Nashik News : मनसेने इंग्रजी पाट्यांना फासले काळे

नाशिकरोड : पुढारी वृत्तसेवा-महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने इंग्रजी पाट्यांना काळे फासण्याचे प्रतिकात्मक आंदोलन केले. शहर संघटक अ‍ॅड. नितीन पंडित, पक्ष निरीक्षक प्रमोद साखरे, शहर उपाध्यक्ष विनायक पगारे, प्रदेश कार्यकारणी सदस्य शशी चौधरी, मनविसे जिल्हा उपाध्यक्ष नितीन धानापुणे, वाहतूक सेनेचे मयूर कुकडे, रंजन पगारे, दत्ता कोठुळे, विल्सन साळवी, आशुतोष बांगर आदींच्या उपस्थित हे आंदोलन झाले.

सर्वाेच न्यायालयाने महाराष्ट्रातील दुकाने व आस्थापना यांच्यावर मराठी पाट्या लावण्याचा आदेश २५ सप्टेंबरला दिला होता. त्यासाठी मुंबईसह राज्यातील व्यापारी संघटनेला दोन महिन्यांची मुदत दिली हाेती. ती २५ नोव्हेंबरला संपुष्टात आली. महाराष्ट्रातील दुकाने, संस्था, आस्थापनांमध्ये मराठी भाषेत पाट्या लावणे व व्यवहार करणे हे दुकान व संस्था अधिनियम १९४८ अन्व्ये बंधनकारक आहे. असे असतानादेखील शहरातील अनेक दुकाने, संस्था, आस्थापना मराठी भाषेत पाट्या न लावता व्यवहार करत आहेत. २५ नोव्हेंबरपर्यंत मराठी पाट्या लावण्याच्या निर्णयाची अंमलबजावणी होते कि नाही याची जबाबदारी त्या-त्या शहरातील स्थानिक स्वराज्य संस्थांवर होती. नाशिक महानगरपालिकेकडून गेल्या दोन महिन्यात शहरातील दुकाने, संस्था, आस्थापनांवर कुठलीही कार्यवाही होताना दिसली नसल्याने मनसेच्या नाशिकरोड शाखेने इंग्रजी पाट्यांना काळे फासण्याचे प्रतिकात्मक आंदोलन केले. आठवड्याभरात मराठी पाट्या केल्या नाही तर इंग्रजी पाट्यांना खरोखर काळे फासू, असा सूचक इशारा यावेळी देण्यात आला.

हेही वाचा :

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news