Nashik News : 16 हजार शेतकऱ्यांसाठी 10 कोटींची नुकसान भरपाई; आमदार डॉ. आहेरांची माहिती | पुढारी

Nashik News : 16 हजार शेतकऱ्यांसाठी 10 कोटींची नुकसान भरपाई; आमदार डॉ. आहेरांची माहिती

देवळा ; पुढारी वृत्तसेवा; अवकाळी पाऊस आणि गारपीटमुळे पिकांचे नुकसान झालेल्या देवळा तालुक्यातील १६ हजार ५३ नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना महायुती सरकारने १० कोटी ५४ लाख ९२ हजार दोनशे चाळीस रुपयांची नुकसान भरपाई मंजूर केली असून, ही रक्कम थेट संबंधित शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होणार आहे.

देवळा तालुक्यात डिसेंबर २१ मध्ये अवकाळी पाऊस आणि गारपीटमुळे कांदा, मका, डाळींब, टोमॅटो, द्राक्ष आणि भाजीपाला पिकांचे मोठे नुकसान झाले होते. या नुकसानीची पाहणी करून पंचनामे करण्याच्या सूचना आमदार डॉ. राहुल आहेर यांनी अधिकाऱ्यांना दिल्या होत्या. पंचनामे झाल्यानंतर तत्कालीन महाविकास आघाडी सरकारने देवळा तालुका नुकसानग्रस्त यादीतून वगळून मालेगाव आणि येवला तालुक्याचा समावेश केला होता. त्यामुळे देवळा तालुक्यातील शेतकऱ्यांवर तत्कालीन सरकारने अन्याय केला होता.

याविरोधात आमदार डॉ. आहेर यांनी अधिवेशनात लक्षवेधी मांडत सरकारचे लक्ष वेधले होते. तरीदेखील महाविकास आघाडीच्या सरकारने नुकसान भरपाई दिली नव्हती. आमदार डॉ. आहेर यांनी सध्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे ही बाब लक्षात आणून देत डिसेंबर २१ मध्ये झालेल्या नुकसान भरपाईसाठी तब्बल १० कोटी ५४ लाख ९२ हजार दोनशे चाळीस रुपयांची मदत मंजूर करून घेतली आहे.

यामुळे गेल्या वर्षी अन्याय झालेल्या देवळा तालुक्यातील १६ हजार ५३ नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आमदार डॉ. आहेर यांनी खऱ्या अर्थाने न्याय मिळवून दिला आहे. ही मदत राज्य शासनाने थेट शेतकऱ्यांच्या खात्यांवर वर्ग केली जाणार आहे. यासाठी महसूल विभागाकडून लाभार्थी शेतकऱ्यांच्या याद्या अपलोड करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

हेही वाचा :

Back to top button