

नाशिक : आर्थिक अडचणीत सापडलेल्या नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेवरून आता राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ आणि कृषिमंत्री ॲड. माणिकराव कोकाटे यांच्यात जुंपली आहे.
भुजबळ यांनी बँकेच्या अडचणीसाठी सर्वपक्षीय नेत्यांना जबाबदार धरत 'या सो कॉल्ड नेत्यांनी बँक बुडवली,' असा आरोप केला होता. या आरोपाला मंत्री कोकाटे यांनी प्रत्युत्तर देत, जिल्हा बँकेसंदर्भात भुजबळांचा गैरसमज झाला असल्याचे सांगितले. तर, 'माझा नेहमीच गैरसमज होतो, त्यांचा समज चांगला आहे. बॅंक कोणी बुडविली हे सांगावे अन् माझा गैरसमज दूर करावा' असे आव्हानच भुजबळ यांनी कोकाटे यांना दिले आहे.
मंत्री भुजबळ यांनी माध्यमांशी संवाद साधताना, नाशिक जिल्हा बँक ही एकेकाळी महाराष्ट्रातील नव्हे, तर हिंदुस्थानमधील दुसऱ्या क्रमांकाची बँक होती. पण, सर्वपक्षीय सो कॉल्ड नेत्यांनी बँक बुडवल्याचा थेट आरोप केला होता. या आरोपास प्रत्युत्तर देताना, मंत्री कोकाटे म्हणाले, निवडणुका घेऊ नये, या मताचा मीसुद्धा आहे. निवडणुका बँकेला परवडणाऱ्या नाहीत. पण सर्वपक्षीय नेत्यांनी बँक संपवली, असा आरोप चुकीचा आहे. त्यांचा कुठेतरी गैरसमज झाला आहे. असे काहीही झालेले नाही. कुठल्याही राजकीय पुढार्याकडे बँकेचे कर्ज येणे नाही. तेव्हा बँक त्यांनी बुडवली, असे म्हणता येणार नाही. काही गोष्टीत चुकीचे निर्णय किंवा अनावश्यक कर्जवाटप झाले आहे. कर्ज वसूल न झाल्याने बँक अडचणीत आली आहे. त्यामुळे कुठल्याही प्रकारचा राजकीय वशिला न ठेवता बँक सुरळीत चालावी, यासाठी प्रशासक राहावा, ही माझी पण भावना आहे. त्यामुळे फार गैरसमज करण्याचे कारण नसल्याचे मंत्री कोकाटे यांनी सांगितले.
मंत्री कोकाटे यांच्या मतावर मंत्री भुजबळ यांनी रविवारी (दि.13) भाष्य केले. ते म्हणाले, माझा नेहमीच गैरसमज होतो. त्यांचा समज चांगला आहे. त्यांनी पहिले हे सांगावे की, ही बॅंक कोणी बुडवली, त्यांना जर हे माहिती असेल तर त्यांनी अगोदर हे सांगावे. कशी रीतीने बॅंक बुडविली हे स्पष्ट करावे. एक नंबरची बॅंक होती महाराष्ट्रातील, देशातील दोन नंबरची बॅंक होती. मी तर, बॅंकेचा संचालक नव्हतो. त्यामुळे माझा झालेला गैरसमज त्यांनी दूर करावा, असे मंत्री भुजबळ यांनी आव्हान दिले.