

नाशिक : आर्थिक अडचणीत सापडलेली नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंक कोणत्याही बॅंकेत विसर्जित होणार नाही, ती बरखास्त होणार नाही. जिल्हा बॅंकेला वाचविण्यासाठी शासनदरबारी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू असून, बॅंकेच्या सक्षमीकरणाला प्राधान्य दिले जात आहे. त्यामुळे पतसंस्थाचालकांनी घाबरून जाऊ नये. बॅंकेत अडकलेल्या सर्व ठेवी सुरक्षित आहेत. त्यांचे व्याज देण्यास आम्ही बांधील आहोत, अशी हमी महाराष्ट्र सहकारी बॅंकेचे प्रशासक विद्याधर अनास्कर यांनी यावेळी दिली.
महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशनच्या नाशिक शाखेतर्फे सोमवारी (दि. २६) गंगापूर रोडवरील शंकराचार्य न्यास येथील सभागृहात 'कर्जे, रोखे गुंतवणूक : माहिती, शंका आणि समाधान' तसेच 'नाशिक जिल्हा बॅंकेत अडकलेल्या ठेवी कशा परत मिळतील?', 'सहकार खात्याची भूमिका काय आहे?', 'राज्य फेडरेशनची भूमिका आणि संस्था सल्लागारांची भूमिका काय असावी?' या विषयावर चर्चासत्र झाले. त्यावेळी मार्गदर्शन करताना अनास्कर बोलत होते.
यावेळी महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष काका कोयटे, जिल्हा सहकारी पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष डॉ. सुनील ढिकले, फेडरेशनच्या उपाध्यक्षा अॅड. अंजली पाटील आणि नारायण वाजे उपस्थित होते.
अनास्कर म्हणाले की, राज्यभरातील सहकारी बॅंका सक्षम करावयाच्या असतील, तर राज्य सहकारी बॅंक सक्षम करणे गरजेचे होते. त्यानुसार राज्य बॅंक सक्षम झाली असून, आता आर्थिक अडचणीत सापडलेल्या जिल्हा बॅंकेला मदत करण्याची भूमिका राज्य सहकारी बॅंकेने घेतली आहे. त्यानुसार नागपूर जिल्हा बॅंकेचे पालकत्व स्वीकारले असल्याचे त्यांनी सांगितले. जिल्हा बॅंकेतील अडकलेल्या ठेवींबाबत भूमिका मांडताना अनास्कर यांनी जिल्हा बॅंकेला वाचविण्यासाठी सुरू असलेल्या प्रयत्नांची, उपाययोजनांची माहिती दिली. बॅंकेचे सक्षमीकरण केले जात आहे. जिल्हाभरातील पतसंस्था तसेच ठेवीदारांच्या २२२ कोटींच्या ठेवी बॅंकेत अडकल्या असून, त्यांना व्याज मिळालेले नाही. मात्र, हे व्याज देण्यासाठी बॅंक प्रयत्नशील आहे. तसेच बॅंक पूर्वपदावर आल्यानंतर टप्प्याटप्प्याने ठेवी दिल्या जातील, असे आश्वासन त्यांनी दिले.
महाराष्ट्र राज्य सहकारी बॅंकेने काढलेल्या कर्जरोख्यांमध्ये पतसंस्थांची गुंतवणूक कशी लाभदायक आहे, याचे विवेचनही अनास्कर यांनी केले आणि कर्जरोखे घेण्याचे आवाहन पतसंस्थाचालकांना केले. काका कोयटे यांनी प्रास्ताविक केले. यावेळी मान्यवरांच्या हस्ते सहकार बास्केट अॅपचे अनावरण करण्यात आले. अॅड. पाटील यांनी सूत्रसंचालन केले, तर वाजे यांनी आभार मानले.
अॅड. सुनील ढिकले यांनी मार्गदर्शन करताना नागपूर जिल्हा बॅंकेच्या धर्तीवर नाशिक जिल्हा बॅंकेचे पालकत्वही महाराष्ट्र राज्य सहकारी बॅंकेने स्वीकारावे, असे साकडे अनास्कर यांना घातले. जिल्हा बॅंकेकडे विश्वासाने पाहिले जात होते. मात्र, पतसंस्थांच्या ठेवी अडकल्यामुळे त्यांच्या व्यवहारांवर परिणाम झाला आहे. त्यामुळे ठेवी मिळविण्यासाठी मदत करावी, अशीही मागणी त्यांनी केली. तसेच अडचणीत सापडलेल्या पतसंस्थांना सावरण्यासाठी आवश्यक ती मदत द्यावी, अशी सादही त्यांनी घातली.
अॅड. ढिकले भूमिका मांडत असताना, व्यासपीठासमोरील पतसंस्थाचालक, संचालक यांची जिल्हा बॅंकेबाबतची तीव्र भावना व्यक्त झाली. जिल्हा बॅंकेच्या आर्थिक अडचणीस शेतकरी नव्हे, तर संचालक मंडळ जबाबदार आहे. त्यामुळे दोषी संचालकांवर कारवाई करावी, अशी जोरदार मागणी सभागृहातून झाली. 'नऊ वर्षे झाली, आमचा धीर सुटत चालला आहे' अशा भावना उपस्थितांनी व्यक्त केल्या.