

Nashik Nandgaon ACB Trap
नांदगाव : दुय्यम निबंधक कार्यालय, नांदगाव येथे खरेदीखताच्या दस्ताची प्रमाणित नक्कल उपलब्ध करून देण्यासाठी लाचेची मागणी करून ती स्वीकारताना डेटा एन्ट्री ऑपरेटर आणि एका खासगी व्यक्तीस लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या नाशिक पथकाने रंगेहात पकडले. या कारवाईमुळे नांदगाव परिसरात खळबळ उडाली आहे.
तक्रारदार यांच्या वडिलोपार्जित शेतजमिनीशी संबंधित न्यायालयीन प्रकरण सुरू असून, त्यासाठी आजोबा व इतर नातेवाईकांनी विक्री केलेल्या शेतजमिनीच्या खरेदीखताची प्रमाणित नक्कल आवश्यक होती. यासाठी तक्रारदारांनी १८ मार्च २०२६ रोजी दुय्यम निबंधक कार्यालयात अर्ज दाखल केला होता.
दस्ताची प्रमाणित नक्कल देण्यासाठी शासनाकडे ऑनलाइन चलनाद्वारे ३२० रुपयांची अधिकृत फी भरून घेतल्यानंतर संबंधित आरोपींनी १,२०० रुपयांची लाच मागितल्याची तक्रार करण्यात आली. तडजोडीनंतर १,००० रुपये स्वीकारण्याचे ठरल्यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून १२ जून २०२६ रोजी दोघांना रंगेहात अटक केली.
या प्रकरणातील आरोपींमध्ये धारासिंग बाबुलाल राठोड (वय ५३), आयटी असिस्टंट (डेटा एन्ट्री ऑपरेटर), दुय्यम निबंधक कार्यालय, नांदगाव आणि सागर राजेंद्र बोरसे (वय ३३), खासगी व्यक्ती, यांचा समावेश आहे.
ही कारवाई पोलीस उपअधीक्षक संतोष पैलकर यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली. पथकात पोलीस हवालदार दिनेश खैरनार, अविनाश पवार तसेच चालक पोलीस शिपाई समीर शेख यांचा सहभाग होता. तपासाची जबाबदारी पोलीस निरीक्षक नेहा सूर्यवंशी यांच्याकडे सोपविण्यात आली आहे.
दोन्ही आरोपींविरुद्ध नांदगाव पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम, १९८८ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस अधीक्षक भारत तांगडे तसेच अपर पोलीस अधीक्षक माधव रेड्डी आणि सुनील दोरगे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई पार पडली.
दरम्यान, शासकीय कामकाजासाठी कोणत्याही अधिकारी किंवा कर्मचाऱ्याकडून लाचेची मागणी होत असल्यास नागरिकांनी त्वरित लाचलुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे. यासाठी टोल फ्री क्रमांक १०६४ तसेच व्हॉट्सअॅप क्रमांक ९९३०९९७७०० उपलब्ध करून देण्यात आला आहे.