

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
२० लाख रुपयांची लाच स्वीकारल्याप्रकरणी अटकेत असलेल्या वस्तू व सेवाकर विभागाच्या अधिकाऱ्यांसह तिघांचा जामीन अर्ज जिल्हा व सत्र न्यायालयाने फेटाळला. कर उपआयुक्त सोमनाथ पागे, राज्य कर सहायक आयुक्त मच्छिंद्र दोंदे तसेच खासगी पंटर अमित जाधव यांचा जामीन अर्ज न्यायालयाने नामंजूर केला.
जिल्हा व सत्र न्यायालयाचे न्यायमूर्ती व्ही. व्ही. काठरे यांच्यासमोर झालेल्या सुनावणीदरम्यान फिर्यादीच्या वतीने अॅड. राहुल कासलीवाल यांनी न्यायालयात युक्तिवाद करताना तपासाच्या दृष्टीने आरोपींना जामीन देणे योग्य नसल्याचे सांगत त्यांनी जामीन अर्जाला विरोध केला.
दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने तिघांचाही जामीन अर्ज फेटाळून लावला. या प्रकरणात अॅड. राहुल कासलीवाल यांना अॅड. हेमीका शाह आणि अॅड. पलक कासलीवाल यांनी सहाय्य केले. कर बुडवेगिरीच्या तपासातून सुटका करून देण्यासाठी संशयितांनी फिर्यादीकडे मोठ्या रकमेची मागणी केल्याचा आरोप आहे.
त्यानंतर २० लाख रुपये स्वीकारताना खासगी पंटर अमित जाधव याला रंगेहाथ पकडण्यात आले होते. न्यायालयातील युक्तिवादात फिर्यादीचे वकील अॅड. राहुल कासलीवाल यांनी काही खळबळजनक दावे केले.
एका आरोपी अधिकाऱ्याने फिर्यादीला तेरी लडकी कौनसे स्कूल में पढ़ती है असे सांगून धमकी दिल्याचा आरोप त्यांनी केला. तसेच एक कोटी रुपये खासगी पंटर अमित जाधवकडे दिल्यानंतर राज्य कर सहायक आयुक्त मच्छिंद्र दोंदे यांनी पैसे तुझ्याकडे ठेव, मी नंतर भेटतो, असे सांगितल्याचा दावा करण्यात आला.