

नाशिक : गेल्या तीन वर्षांपासून नामको बँकेच्यावतीने आयोजित केला जात असलेला वाहन मेळावा उपक्रम स्तुत्य असल्याचे प्रतिपादन प्रकाश मोहरीर यांनी केले.
गंगापूर रोड येथील डोंगरे वसतिगृह येथे आयोजित कुंभ मेळावा २०२५ च्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. यंदा सर्वांचेच उद्दिष्ट दुप्पट होणार आहे. सरकारने जीएसटी कमी केल्याने त्याचा फायदा मिळणार असल्याचेही मोहरीर यांनी स्पष्ट केले.
बँकेचे अध्यक्ष हेमंत धात्रक म्हणाले, दोन लाख सभासद व चार लाख कर्जदार याचा फायदा घेऊ शकतात. इलेक्ट्रिक वाहन कर्ज ८.७५ टक्के असून, इतर वाहन कर्ज ९ टक्के आहे. ग्रामीण भागातील शेतकरी सुद्धा या वाहन कर्जापासून वंचित राहू नये म्हणून सर्वांनी प्रयत्न केले पाहिजे. बँकेच्या ८० शाखांच्या माध्यमातून हा वाहन कुंभमेळा ३१ मार्च २०२६ पर्यंत पुढे नेण्याचा संकल्प त्यांनी व्यक्त केले. माजी आमदार वसंत गिते यांनी मनोगत व्यक्त केले. त्रिगुण कुलकर्णी यांनी सर्व वाहने एकाच ठिकाणी उपलब्ध करून देण्याचा आमचा संकल्प पूर्ण झाला. सर्व नामांकित कंपन्या उपस्थित राहिल्याबद्दल त्यांनी आभार व्यक्त केले.
मुख्य कार्यकारी अधिकारी विश्राम दीक्षित यांनी, १३,१४ कंपन्या मेळाव्यात सहभागी झाल्या असून, १२५ कर्जाचे उद्दिष्ट आहे. यंदा जीएसटीचे दर कमी केल्याने उद्दिष्ट पूर्ण होणार असल्याचा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. सूत्रसंचान समानता लोंढे यांनी केले, तर आभार उपाध्यक्ष सुभाष नहार यांनी मानले. कार्यक्रमास जनसंपर्क संचालिका शितल भट्टड, संचालक विजय साने, भानुदास चौधरी, नरेंद्र पवार, अॅड. आकाश छाजेड, हरीष लोढा, ललितकुमार मोदी, अविनाश गोठी, अशोक सोनजे, देवेंद्र पटेल, सपना बागमार, प्रथमेश गिते आदी उपस्थित होते.