

नाशिक : नासिक मर्चन्टस को- ऑप. बँकेच्या मालेगाव शाखेतील १४ खात्यांमधून अवघ्या काही दिवसांमध्ये तब्बल ११४ कोटींचे व्यवहार झाल्याच्या प्रकरणाने देशभर खळबळ उडवून दिली आहे. या व्यवहाराचा शोध घेण्यासाठी देशातील सर्वच तपास यंत्रणा काम करीत आहेत. मात्र, हा व्यवहार केवळ नामको बँकेतूनच झाला नसून, तब्बल २१ नामांकित बॅंकांमधून २२ राज्यांत झाल्याचा खुलासा बँकेचे चेअरमन सोहनलाल भंडारी यांच्यासह संचालक मंडळाने केला आहे. तसेच 'नामको'ची आर्थिक घडी सुस्थितीत असून, सभासदांनी विचलित होऊ नये, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.
२३ सप्टेंबर ते १० ऑक्टोबरदरम्यान नामकोच्या मालेगाव शाखेत उघडण्यात आलेल्या १४ खात्यांमधून तब्बल ११४ कोटींची उलाढाल केली गेली. या प्रकरणी १४ पैकी १२ खातेदारांनी सिरास अहमद याच्यासह मालेगाव शाखेचे शाखाधिकारी व उपशाखाधिकारी यांच्या विरोधात पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाची पोलिसांसह ईडी, सीबीआय, आयकर विभागासह अन्य तपास यंत्रणांकडून शोध घेतला जात आहे. मात्र, प्रत्येकवेळी नामको बँकेचे नाव समोर येत असल्याने, नामकोनेच हे प्रकरण उजेडात आणल्याचा खुलासा चेअरमन भंडारी यांनी केला आहे. वास्तविक, नामकोसह २१ नामांकित बँकांमधून तब्बल २२ राज्यांमध्ये दोन हजार ३७ ट्रान्झिक्शनच्या माध्यमातून ११४ कोटींची उलाढाल केली आहे. ६९ कोटी आरटीजीएस, २३ कोटी ८६ लाख एनईएफटी, तर पाच कोटी २२ लाख आयएमपीएसच्या माध्यमातून खात्यात आले आहेत. तर ८२ कोटी आरटीजीएस, २२ कोटी २९ लाख आयएमपीएसच्या माध्यमातून अन्य खात्यावर पाठविण्यात आले आहेत. १४ कोटी रोखीत काढण्यात आले आहेत. कमी कालावधीत एवढ्या मोठ्या प्रमाणात उलाढाल झाल्याचे लक्षात येताच तत्काळ या प्रकरणाला नामको बँकेनीच वाचा फोडल्याचे भंडारी यांनी स्पष्ट केले.
१४ खाते उघडताना सर्व आवश्यक कागदपत्रांची पूर्तता केली गेली आहे. पॅनकार्ड, आधारकार्ड, व्यवसायाचे दाखले म्हणजे उद्याम, शॉपअॅक्ट, कृषी उत्पन्न बाजार समितीचा परवाना आदी कागदपत्रे शाखेत जमा आहेत. बँकेनी अत्यंत पारदर्शकपणे सर्व व्यवहार केले असून, यापुढेही कामकाजात असाच पारदर्शकपणा राहणार आहे. त्यामुळे बँकेबाबत केली जात असलेली बदनामी थांबवावी, असे आवाहनही अध्यक्ष सोहनलाल भंडारी, ज्येष्ठ संचालक वसंत गिते, हेमंत धात्रक, विजय साने, प्रशांत दिवे, शीतल भट्टड, सीईओ विश्राम दीक्षित यांनी केले आहे.
नामको बँकेतील संशयास्पद खात्यावर झालेल्या कोट्यवधीच्या उलाढालीला भाजप नेते किरीट सोमय्या यांनी 'व्होट जिहाद' असे संबोधले आहे. मात्र, हा मोठा स्कॅम असल्याचा संशय नामको बँक संचालकांनी व्यक्त केला आहे. तपास यंत्रणांनी याचा शोध घ्यावा, अशी मागणीही यावेळी केली.