नाशिक : नामको बँकेचे 'स्मॉल बँक फायनान्स'मध्ये रुंपातर करण्याच्या ठराव चांगलाच वादळी ठरला. बँकेचेे अध्यक्ष हेमंंत धात्रक यांनी सदर प्रस्ताव सादर करताना सभासदांना चर्चा करण्यास आमंत्रित केले. यावेळी काही सदस्यांनी समर्थनार्थ प्रतिक्रिया नोंदविल्या, तर काहींंनी विरोधाचा सूर आवळला. विशेषत: विरोधी गटाचे गजानन शेलार यांनी प्रस्ताव नामंजूर करावा, अशी ठाम भूमिका मांडत समर्थकांसह व्यासपीठाकडे धाव घेतली. मंजूर-नामंजूरच्या घोषणा सुरू असतानाच अध्यक्षांनी आवाजी मतांच्या आधारे गदारोळातच ठरावाला मंजूरी दिली. तसेच राष्ट्रगीत घेत सभा गुंडाळली. यावेळी शेलार यांनी प्रतिसभा घेत न्यायालयात धाव घेणार असल्याचा इशारा दिला.
दि नासिक मर्चन्ट को-ऑप. बँकेची (नामको) शनिवारी (दि.२०) सातपूर येथील प्रशासकीय कार्यालयात घेण्यात आलेली ६७ वी वार्षिक सर्वसाधारण सभा अपेक्षेप्रमाणे वादळी ठरली. सभेत १८ ठराव मांडण्यात आले. पहिल्या १४ ठरावांंना किरकोळ दुरुस्त्या तसेच सूचनांव्यतिरिक्त मंजूरी देण्यात आली. मात्र, १५ व १६ वा विषय नामको स्मॉल फायनान्स अर्थात लघु वित्तीय बँकेत संक्रमित करण्याचा असल्याने, अध्यक्ष धात्रक यांनी या विषयावर प्रस्तावना करीत, सभासदांना चर्चा करण्यास आमंत्रित केले. यावेळी सभासदांनी ठराव्याच्या समर्थनार्थ, तर काहींनी विरोधात भूमिका मांडली. विरोधी गटाचे शेलार यांनी, हा ठराव नामंजूर केला जावा अशी ठाम मत व्यक्त करीतल बँकेच्या कामकाजात सुधारणा करावी, संचालकांना जबाबदाऱ्या दाव्यात असे उपाय सूचविले. यावेळी अध्यक्ष धात्रक यांनी माइकचा ताबा घेत, ठराव मान्य करावाच लागेल अशी भूमिका मांडताना ठरावाच्या समर्थनार्थ आणि विरोधातील सभासदांनी हात वर करण्यास सांगितले. यावेळी शेलार यांच्यासह त्यांच्या समर्थकांनी थेट व्यासपीठाकडे धाव घेत 'नामंजूर-नामंजूर'च्या घोषणा देण्यास सुरुवात केली. मात्र, धात्रक यांनी आवाजी मतांचा आधार घेत, ठरावास मंजूरी दिली. तसेच राष्ट्रगीत घेत, सभा गुंडाळली.
राष्ट्रगीतानंतर शेलार यांनी प्रतिसभा घेण्याचा प्रयत्न केला. दडपशाही पद्धतीने ठराव मंजूर केल्याचा आरोप केला. तसेच आमचा विरोध रिझर्व्ह बँकेकडे नोंदविला जाईल, वेळप्रसंगी न्यायालयात धाव घेवू असा इशाराही दिला. याप्रसंगी उपाध्यक्ष सुभाष नहार, जनंसर्क संचालक शितल भट्टड, ज्येष्ठ संचालक वसंत गिते, सोहनलाल भंडारी, महेंद्र बुरूड, गणेश गिते, भानुदास चौधरी, नरेंद्र पवार, आकाश छाजेड, रंजन ठाकरे सपना बागमार आदी उपस्थित होते.
बँकेचे दोन लाखांपेक्षा अधिक सभासद असून, सभेला केवळ ७५६ सभासदांची उपस्थिती होती. याचा अर्थ ०.३८ टक्के सभासद उपस्थित असल्याने, अशाप्रकारच्या ठरावाला मंजूरी कशी काय देवू शकता? उपस्थित सभासदांपैकी ६० टक्के सभासदांनी ठरावाला विरोध दर्शविला. मात्र, संचालक मंडळाने दडपशाहीने ठराव मंजूर केला. गोंधळात राष्ट्रगीत घेवून राष्ट्रगीताचा अपमानही केला. याबाबत संचालक मंडळावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करायला हवा. या ठरावाबाबतचा विरोध आम्ही रिझर्व्ह बँकेकडे नोंदविणार आहोत. वेळप्रसंगी न्यायालयात धाव घेवू.
गजानन शेलार, सभासद
नामको बँकेची ज्या सभासदाला निवडणुक लढवायची असेल, त्यास दोन वर्षे अगोदरच २५ हजारांचे शेअर आणि दोन लाख रुपये डिपॉझिट करणे सक्तीचे असेल, असा पोटनियम दुरुस्तीचा ठराव सभेपुढे मांडला असता, त्यासही गजानन शेलार, संदीप भवर यांनी विरोध केला. सर्वसामान्य सभासदालाही निवडणूक लढण्याचा अधिकार असल्याने, हा नियम त्यांच्या अधिकाऱ्यावर गदा आणणारा असल्याचे मत व्यक्त केले. तसेच दोन वर्षांएेवजी एक वर्षाचा कार्यकाळ ठेवावा, असेही मत व्यक्त केले. त्यास संचालकांनी समर्थता दर्शविली.
नामको बँकेचे स्मॉल फायनान्समध्ये रुंपातर केल्यास, सभासदांना अधिकाधिक सेवा देणे शक्य होणार आहे. बँकेच्या दोन लाख सभासदांपैकी सव्वा लाख सभासद ग्रामीण भागातील आहेत. या सभासदांना कर्ज उपलब्ध करून देणे शक्य होणार आहे. स्मॉल फायनान्समध्ये रुंपातर करताना बँकेचे नाव देखील नामको राहणार आहे. केवळ 'को-आॅप.' हा शब्द वगळला जाईल. सभासदांचे अधिकार अबाधित राहतील. संचालक मंडळांबरोबरच प्रवर्तक नेमावे लागतील. हे रुंपातर करण्याची प्रक्रिया मोठी असल्याने, त्यास मंजूरी देवून प्रोसेडिंग करणे आवश्यक होते.
हेमंत धात्रक, अध्यक्ष, नामको
शंभर रुपयांचे भागभांडवल घेवून सभासदत्व मिळविलेल्या सभासदांना आता एक हजार रुपयांचे भागभांडवल घ्यावे लागणार आहेत. ६५ हजारांपेक्षा अधिक सभासदांचे शंभर रुपये भागभांडवल आहेत. या सभासदांचे सभासदत्व टीकवून ठेवण्यासाठी एक हजार रुपयांचे भागभांडवल घ्यावे लागणार आहेत. मात्र, या सभासदांचा शोध घेण्याचे मोठे आव्हान बँकेसमोर आहे.
नामकोचे स्मॉल फायनान्समध्ये रुंपातर करण्यासाठी सर्व सभासदांचे मते जाणून घेण्यासाठी मतदान घेतले जाणार आहे. सभासदांचा कौल जाणून घेतल्यानंतरच बॅंकेला स्मॉल फायनान्समध्ये रुंपातरीत करण्याबाबतचा निर्णय घेतला जाईल, असेही संचालक मंडळाकडून स्पष्ट करण्यात आले.
मंजूर-नामंजूरच्या घोषणा दिल्या जात असतानाच काही सभासदांनी व्यासपीठाकडे धाव घेत, अध्यक्षासमोरील माइक हिसकावला. तसेच सभेनंतर माइक बंद केला म्हणून ध्वनी सहाय्यकास धक्काबुक्की करण्यात आली. सभेत गोंधळ होवू नये म्हणून अगोदरच बाऊन्सरही तैनात करण्यात आले होते.
धनंजय अबोले : स्मॉल फायनान्समध्ये रुंपातर झाल्यास पाच टक्के भागभांडवल घेतलेला व्यक्ती बँकेचा मालक होईल. बॅलेट पेपरवर मतदान होणार नाही. मतदानाचा हक्क हिरावून घेतला जाईल. फायनान्समध्ये रुंपातर केल्यास सहकाराचा उद्देश राहणार नाही.
ॲड. श्रीधर व्यवहारे : प्रायव्हेट बँक सुरू करायचीच असेल तर संचालक मंडळाने स्वतःच्या पैशाने नवीन बँक स्थापन करावी. विद्यमान अध्यक्ष हेमंत धात्रक यांचे नाव प्रसिद्ध असून, त्यांनी हेमंत धात्रक फायनान्स कार्पोरेशन अर्थात एचडीएफसी-२ सुरू करावी. त्यास आम्ही सहकार्य करू. पण नामको बँकेचे अस्तित्व संपवणे आम्हाला मान्य नाही.
नंदन भास्करे : स्मॉल फायनान्स कंपनी झाल्यास महिला व इतर आरक्षण राहणार काय? या ठरावाबाबत चार संचालक सोडले तर इतर संचालकांना याबाबतचे ज्ञान आहे काय? हे स्पष्ट करावे.
संतोष मंडलेचा : सहकारातून स्मॉल फायनान्समध्ये जाण्याची तरतुद आहे काय? याची माहिती घ्यावी.
संतोष वाखारकर : सहकारातून ही बँक जन्माला आली. ती सहकारीच राहावी.
भगवान भोगे : या विषयावर आपण मतदान घेणार आहात काय? स्मॉल फायनान्स कंपनी ॲक्टमध्ये येणार काय?
जगदीश घोळके : खासगीकरण केल्यास सर्वसामान्य सभासदांचा विचार व्हावा. काळानुरूप बदल होत असेल तर माझे त्यास समर्थन आहे.
भीमराज जोंधळे : शेतकऱ्यांना कर्ज मिळत असेल तर ठराव मंजूर करावा.
अख्तर शेख : माझे या ठरावाला समर्थन आहे. बँकेची प्रगती होत असेल तर प्रत्येकाने त्यास समर्थन द्यायला हवे.
प्रकाश घुगे : जो जास्त भागभांडवल घेईल, त्याची जबाबदारी वाढेल. त्यामुळे विषयाला मान्यता द्यावी.
सुधाकर बोडके : बँक मोठी होण्याकरीता हा ठराव मांडला असेल तर शेतकऱ्यांच्यावतीने त्यास अनुमोदन आहे.
राजाभाऊ सांगळे : स्मॉल फायनान्स बँक केल्यास शेतकऱ्यांना क्रेडिट कार्ड देणे शक्य होईल. त्यातून बँकेचेही उत्पन्न वाढेल.
बंडू काका बच्छाव : काळानुसार बदलायला हवे. सभासदांकडून यास गालबोट न लावता, मान्यता द्यायला हवी. स्मॉल फायनान्स झाल्यास त्याचा सर्वांनाच फायदा होईल.
योगेश दायमा : परिवर्तन केल्यास स्पर्धेत टीकणे शक्य होणार आहे. मी स्मॉल फायनान्स ठरावाचे समर्थन करतो.