

Naigavan fodder burnt
नगरसुल : येवला तालुक्यातील नायगव्हाण येथे भीषण आगीत जनावरांसाठी साठवून ठेवलेला अंदाजे ३५ ते ४० ट्रॅक्टर चारा जळून खाक झाल्याची घटना घडली. या आगीत मोठे आर्थिक नुकसान झाले असून दूध व्यवसायिक लहानू दत्तू सदगीर यांनी शासनाकडे आर्थिक मदत व जनावरांसाठी चाऱ्याची मागणी केली आहे.
लहानू सदगीर यांनी आपल्या जनावरांसाठी परिसरातील विविध गावांमधून मोठ्या प्रमाणात चारा विकत आणून त्याची कुट्टी करून शेतात साठवून ठेवली होती. मात्र दुपारच्या सुमारास अचानक आग लागल्याने संपूर्ण चारा काही क्षणांत जळून खाक झाला. यासोबतच २० पाईप तसेच शेतात टाकण्यासाठी गोळा करून ठेवलेले अंदाजे २० ट्रेलर शेणखतही आगीत नष्ट झाले.
चाऱ्याच्या शेजारीच जनावरांचे शेड असून त्यात बैल, गाई व शेळ्या बांधलेल्या होत्या. आगीच्या झळांमुळे एका बैलाला होरपळल्याची माहिती मिळाली आहे.
घटनेवेळी घरातील सर्व सदस्य लग्नसमारंभासाठी बाहेर गेले होते. घरात केवळ लहान मुले होती. अचानक बाहेर मोठा धुरळा आणि जाळ दिसताच मुलांनी आरडाओरड केल्याने ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली. ग्रामस्थांनी पाण्याच्या टँकरच्या सहाय्याने आग विझवण्याचा प्रयत्न केला, मात्र आग भीषण असल्याने ती नियंत्रणाबाहेर गेली.
दरम्यान, सरपंच सुनील भाऊ साळवे यांनी तात्काळ अग्निशमन दलाला माहिती दिली. अग्निशमन दलाच्या मदतीने अखेर आग आटोक्यात आणण्यात आली.
मी दूध व्यवसाय करीत असल्याने जनावरांसाठी आसपासच्या गावांतून चारा विकत आणून साठवून ठेवला होता. मात्र ही संपूर्ण साठवण आगीत जळून खाक झाली. शासनाने मला आर्थिक मदत तसेच जनावरांसाठी चारा उपलब्ध करून द्यावा.
- लहानू दत्तू सदगीर, दूध व्यावसायिक शेतकरी