

नाशिक : सत्ताधारी भाजप, शिंदे शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) युतीला आव्हान देण्यासाठी महाविकास आघाडी एकजुठ झाली खरी. मात्र, भाजप असो की, युती यांच्या समोर उमेदवार देताना आघाडीची मोठी दमछाक झाली. यातच जागा वाटपाचा तिढा छाननीपर्यंतही सुटे न शकल्याने शिवसेना (उबाठा) व मनसेचेच पाच ठिकाणी उमेदवार समोरासमोर आहेत. तर सहा प्रभागात 11 ठिकाणी शिंदे शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) यांचेही उमेदवार आमने-सामने उभे ठाकले गेले आहेत. तर काही ठिकाणी मैत्रीपूर्ण लढती होत आहे.
महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्याच्या राजकारणात उबाठा शिवसेना आणि मनसेची युती झाली असली, तरी नाशिकमध्ये मात्र या युतीला तडा गेला आहे. युतीत मोठ्या भावाची भूमिका बजावणाऱ्या उबाठा शिवसेनेने थेट मनसेविरोधात उमेदवार उभे केल्याने मनसेची पाच प्रभागातील पाच जागांवर कोंडी झाली आहे.
भाजप - शिवसेना सत्ताधाऱ्यांना रोखण्यासाठी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी राज्यपातळीवर हातमिळवणी केली आहे. त्यानुसार नाशिक महापालिकेत शिवसेना (उबाठा) 79 तर मनसे 33 जागा लढविणार असल्याचा निर्णय झाला होता. मात्र, युती झाल्यानंतरही उबाठाकडून पाच प्रभागांमध्ये मनसेच्या उमेदवारांसमोर स्वतःचे उमेदवार देण्यात आले आहेत.
भाजपला सोडचिठ्ठी देत शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) यांनी स्वतंत्र युती केली असली, तरी नाशिक महापालिका निवडणुकीत जागावाटपावरून दोन्ही पक्षांमध्ये मोठा गोंधळ उडाला आहे. तब्बल सहा प्रभागांतील 11 ठिकाणी शिवसेना आणि राष्ट्रवादीचे उमेदवार आमनेसामने उभे राहिल्याने युतीतील अंतर्गत विसंवाद उघड झाला आहे.
मनसे-उबाठा उमेदवार आमने-सामने असलेले प्रभाग, त्यांचे उमेदवार
प्रभाग 5 (ड) : तेजस खांदवे (उबाठा) - नवनाथ जाधव (मनसे)
प्रभाग 23 (ड) : प्रवीण जाधव (उबाठा) - स्वागता उपासनी (मनसे)
प्रभाग 24 (ड) : सीमा बडदे (उबाठा) - संदीप दोंदे (मनसे)
प्रभाग 25 (ड) : मुरलीधर भामरे (उबाठा) - राहुल पाटील (मनसे)
प्रभाग 27 (क) : हर्षदा सोनवणे (उबाठा) - श्रीताई सुधाकर कोदे (मनसे)
या प्रभागांत शिवसेना-राष्ट्रवादी मैत्रीपूर्ण लढत
प्रभाग 11 (अ) : योगेश गांगुर्डे (शिवसेना) - विजय अहिरे (राष्ट्रवादी)
(ड) : धीरज शेळके (शिवसेना) - जीवन रायते (राष्ट्रवादी)
प्रभाग 13 (क) : दीपक डोके (शिवसेना) - शेखर देवरे (राष्ट्रवादी)
प्रभाग 14 (क) : रूपाली डहाके (शिवसेना) - हाश्मी अलफान (राष्ट्रवादी)
प्रभाग 18 (अ) : आशा पवार (शिवसेना) - रोहित गाडे (राष्ट्रवादी) (ब) : रंजना बोराडे (शिवसेना) - वंदना बोराडे (राष्ट्रवादी) (ड) : सुनील बोराडे (शिवसेना) - योगेश मिसाळ (राष्ट्रवादी)
प्रभाग 19 (अ) : विशाखा भडांगे (शिवसेना) - शीतल साळवे (राष्ट्रवादी) (ब) : पंडित आवारे (शिवसेना) - सचिन आहेर (राष्ट्रवादी) (क) : जयश्री खर्जूल (शिवसेना) - शोभा आवारे (राष्ट्रवादी)
प्रभाग 24 (ड) : सागर मोटकरी (शिवसेना) - अमर वझरे (राष्ट्रवादी)