

विशेष प्रतिनिधी
नांदेड ः शिवसेनेच्या दोन आमदारांनी नांदेडच्या दक्षिण भागात राष्ट्रवादी काँग्रेससोबत शेवटच्या क्षणी युती केली; पण उत्तर क्षेत्रात शिवसेना स्वबळावर लढत असून पक्षाच्या उमेदवारांना निवडून आणण्याचे ‘शिवधनुष्य’ आ.बालाजी कल्याणकर यांनी एकहाती उचलले आहे.
नांदेड मनपा निवडणुकीच्या प्रचाराला गती येत आहे. भाजपाने 1 ते 5 जानेवारीदरम्यान दणकेबाज कार्यक्रम घेत शक्तिप्रदर्शन केले. तर नांदेड उत्तर मतदारसंघात कल्याणकर यांनी युक्ती आणि भक्तिप्रदर्शनावर भर देत, मतदारांशी थेट संवाद, सकाळच्या फेरीतील भेटीगाठींच्या माध्यमातून प्रचार चालवला आहे.
मनपाच्या मागील निवडणुकीत सेनेतर्फे केवळ कल्याणकर विजयी झाले होते. या नगरसेवकपदाच्या भांडवलावर त्यांनी 2019 व 2024 साली आमदारकी मिळवत आपल्या कार्याचा विस्तार केला. ‘प्रभाग एक’ म्हणजे त्यांचे बलस्थान. या प्रभागातून त्यांनी आपले पुत्र सुहास यास मनपातील आपला वारसदार करण्याचे ठरवले असून या प्रभागातील चारही जागा कल्याणकरांनी प्रतिष्ठेच्या केल्या आहेत.
‘आम्ही लढणार प्रभागाच्या विकासासाठी’ असा निर्धार शिवसेनेेने या प्रभागामध्ये केला आहे. आमदारकीच्या 6 वर्षांच्या कारकीर्दीत कल्याणकर यांनी आपल्या मतदारसंघासह वरील प्रभागात नागरी सुविधांची अनेक कामे करताना उत्कृष्ट लोकसंपर्क राखल्यामुळे या प्रभागात शिवसेनेचीच हवा असल्याचा दावा पक्षाच्या पदाधिकाऱ्यांकडून करण्यात येत आहे.
प्रभाग क्र.1 आणि 2मधील आठ जागांवर कल्याणकर यांनी आपले लक्ष केंद्रित केले आहे. प्रभाग 1मध्ये सर्वाधिक 33 उमेदवार रिंगणामध्ये आहेत. भाजपा, शिवसेना (उबाठा), राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या पक्षांनी सर्व जागांवर आपले उमेदवार उभे केल्यामुळे या प्रभागात मोठी चुरस निर्माण झाली असल्याचे दिसून आले.
प्रभाग क्र.एकमधील वेगवेगळ्या वसाहतींशी माझा मागील 10 वर्षांपासून थेट संबंध आहे. आधी नगरसेवक व नंतर आमदार या नात्याने मी या प्रभागात अनेक कामे पूर्ण केली. मला माझ्या प्रभागाची चिंता वाटत नाही; पण अन्य प्रभागांतील शिवसेनेच्या उमेदवारांना निवडून आणण्यास माझे प्राधान्य असल्याचे कल्याणकर यांनी नमूद केले.