

सिल्लोड: वीज वितरण विभागातर्गत येणाऱ्या विविध प्रश्नांचा आढावा घेण्यासाठी आमदार अब्दुल सत्तार यांच्या अध्यक्षतेखाली सिल्लोड येथील वीज वितरण कार्यालय परिसरात महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत तालुक्यातील वीजपुरवठ्याची सद्यस्थिती, प्रलंबित वीजकामे, नवीन वीज जोडण्या, वारंवार होणारे वीजखंडित प्रकार तसेच शेतकरी व नागरिकांच्या तक्रारींवर चर्चा करण्यात आली.
बैठकीदरम्यान आमदार अब्दुल सत्तार यांनी अधिकाऱ्यांना नागरिकांच्या तक्रारीची तातडीने दखल घेऊन वेळेत निराकरण करण्याचे स्पष्ट निर्देश दिले. ग्रामीण भागातील वीजपुरवठा सुरळीत ठेवणे, शेतीपंपांना नियमित वीज देणे आणि बिघडलेल्या वीज उपकरणांची तत्काळ दुरुस्ती करण्यावर त्यांनी भर दिला.
कामांमध्ये दिरंगाई झाल्यास संबंधित अधिकाऱ्यांवर जबाबदारी निश्चित केली जाईल, असा इशाराही त्यांनी दिला. बैठकीत गावनिहाय तक्रारींचा आढावा घेण्यात आला. सिल्लोडसाठी उपलब्ध असलेली वीज आधीच कमी असून क्षमतेपेक्षा जास्त भारामुळे वीजखंडित प्रकार व ट्रान्सफॉर्मरवर येणारा ताण वाढत असल्याने यावर तातडीने ठोस उपाययोजना करण्याचे निर्देश आमदार अब्दुल सत्तार यांनी दिले.
या बैठकीस वीज वितरण विभागाचे अधीक्षक अभियंता संदीप दरवडे, कार्यकारी अभियंता अविनाश राऊत, अतिरिक्त कार्यकारी अभियंता विठ्ठल सपकाळ, उपकार्यकारी अभियंता प्रदीप काळे, नवज्योत मांडे, सहायक अभियंता धम्मपाल म्हस्के यांची उपस्थिती होती.
किमान ८ तास अखंडित वीज पुरवठा
शेतकऱ्यांच्या वीजपुरवठ्याबाबत ठाम भूमिका मांडत, शासनाच्या नियमानुसार दररोज किमान ८ तास अखंडित वीजपुरवठा देण्याचे निर्देश आमदार अब्दुल सत्तार यांनी वीज वितरण विभागाला दिले. वीजपुरवठ्यातील अनियमितता व शेतकऱ्यांची पिळवणूक खपवून घेतली जाणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले. तसेच शेतकरी व ग्राहकांसाठीच्या योजना प्रभावीपणे राबविण्याचे आदेश दिले.