नाशिक : महापालिका निवडणुकांसाठी राज्य निवडणूक आयोगाने आरक्षण सोडतीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. त्यानुसार नाशिक महापालिकेसाठी येत्या १० नोव्हेंबर रोजी आरक्षण सोडत काढली जाणार आहे. महापालिका क्षेत्रातील आरक्षणाची संख्या निश्चित करून अनुसूचित जाती, जमाती आणि इतर मागासवर्ग प्रवर्गासाठी चक्राकार पद्धतीने आरक्षण सोडतीची प्रक्रिया ३० ऑक्टोबर ते २ डिसेंबर या कालावधीत पूर्ण करावी लागणार आहे.
सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार महापालिकांच्या सार्वत्रिक निवडणुका होत आहेत. नाशिक महापालिका निवडणुकीसाठी २०१७ नुसारच प्रभागरचना करण्यात आली असून, त्यानुसार चार सदस्यीय २९, तर तीनसदस्यीय दोन प्रभाग अस्तित्वात आले आहेत. गत निवडणुकीप्रमाणेच प्रभाग क्रमांक १५ व १९ हे तीनसदस्यीय प्रभाग कायम आहेत.
उर्वरित प्रभाग चार सदस्यांचे आहेत. या निवडणुकीसाठी मतदार याद्यांचा कार्यक्रम देखील जाहीर करण्यात आला असून, त्यानुसार विधानसभा निवडणूक २०२४ साठी निश्चित केलेल्या मतदार याद्यांचे विभाजन करून प्रभागनिहाय मतदार याद्या तयार करण्याचे काम सुरू आहे. दि. ५ नोव्हेंबरपर्यंत प्रभागनिहाय प्रारूप मतदार याद्या प्रसिद्ध केल्या जाणार आहेत. त्यानंतर आता आरक्षण सोडतीचा कार्यक्रम जाहीर झाला असून, त्यामध्ये चक्रानुकार पद्धतीने प्रभागनिहाय आरक्षण जाहीर केले जाणार आहे. त्यामध्ये सध्याच्या लोकसंख्येनुसार आता नव्याने प्रभाग निश्चिती केल्यानंतर उतरत्या क्रमानुसार अनुसूचित जाती-जमाती व इतर मागासवर्ग असे प्रवर्गनिहाय आरक्षण पडले जाणार आहे. त्यानुसार मार्गदर्शक सूचना जाहीर केल्यानंतर आयोगाने आता आरक्षण सोडतीचा कार्यक्रम जाहीर केला आहे.
स्री पुरुष आरक्षण चिठ्ठी पद्धतीने
महापालिकेच्या ३१ प्रभागातील १२२ जागांपैकी ६१ जागांवर महिला आरक्षण काढण्याची प्रक्रिया ११ नोव्हेंबर पर्यंत पूर्ण करावी लागणार आहे. प्रशासकीय सूत्रांच्या म्हणण्यानुसार १० नोव्हेंबर रोजी आरक्षण सोडत काढली जाईल. चक्रानुकार पद्धतीने आरक्षण सोडतीची ही पहिलीच निवडणूक असणार आहे. प्रभागातील जागांना अनुक्रमे अ, ब, क व ड याप्रमाणे क्रमांक देऊन अनुसूचित जाती, जमाती आणि इतर मागासवर्ग प्रवर्गासाठी चक्राकार पद्धतीने आरक्षण निश्चिती केली जाणार आहे. स्त्री आणि पुरुष या आरक्षण निश्चितीसाठी मात्र चिठ्ठी पद्धतीने फैसला होणार आहे.
असा आहे सोडतीचा आरक्षण
आरक्षित जागांची संख्या निश्चित करून आयोगाच्या मान्यतेसाठी सादर करणे - ३० ऑक्टोबर ते ४ नोव्हेंबर
आरक्षण सोडतीची जाहीर सूचना प्रसिद्ध करणे - ८ नोव्हेंबर २०२५
आरक्षणाची सोडत काढून निकाल आयोगाच्या मान्यतेसाठी सादर करणे - ११ नोव्हेंबर २०२५
प्रारुप आरक्षण, हरकती व सूचना मागविण्यासाठी विहीत नमुन्यात प्रसिद्ध करणे - १७ नोव्हेंबर २०२५
प्रारुप आरक्षण हरकती व सूचना मागविण्याचा अंतिम दिनांक - २४ नोव्हेंबर २०२५
प्रारुप आरक्षणावर प्राप्त झालेल्या हरकती व सूचनांवर विचार करून मनपा आयुक्त यांनी आदेशाच्या परिशिष्ट -११ मधील नमुन्यात निर्णय घेणे - २५ नोव्हेंबर ते १ डिसेंबर २०२५
आयोगाच्या मान्यतेनंतर अंतिम आरक्षण विहीत नमुन्यात शासन राजपत्रात प्रसिद्ध करणे - २ डिसेंबर २०२५