

नाशिक : रस्त्यांवरील खड्डे तसेच विविध नागरी समस्यांमुळे नागरिकांमध्ये रोष असल्याने जनमानसातील प्रतिमा उंचावण्यासाठी महापालिकेने आता सोशल मीडियाचा आधार घेतला आहे. माहिती तंत्रज्ञान विभागाकडून विविध प्रकारचे 'रील्स' तयार केले जाणार असून, ते सोशल मीडियावर प्रसारित केले जाणार आहेत.
पावसामुळे रस्त्यांची झालेली दुरवस्था आणि ऐन पावसाळ्यात शहरात निर्माण झालेली कृत्रिम पाणीटंचाई यामुळे नाशिककर हैराण झाले आहेत. त्यामुळे नागरिकांकडून महापालिकेच्या कारभारावर टीकेची झोड उठली आहे. या प्रश्नांसह शहरातील अस्वच्छता, गोदावरीचे प्रदूषण, रस्त्यालगत टाकण्यात येणारा बांधकामाचा राडारोडा, शहर परिसरातील अतिक्रमणे, अनधिकृत होर्डिंग्ज अशा विविध प्रश्नांबाबतही महापालिकेतील संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांकडून योग्यवेळी दखल घेतली जात नसल्यानेही महापालिकेच्या कारभाराविषयी लोकांमध्ये तीव्र नाराजी निर्माण होत आहे. या प्रश्नांबाबत तर सध्या नागरिकांकडून विविध प्रकारच्या सोशल मीडियाचा वापर करून आपल्या भावना व्यक्त केल्या जातात. खड्ड्यांबाबत तर गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर रील्स सादर केल्या जात असल्याने त्यातून महापालिकेची प्रतिमा खराब होत असल्यामुळे महापालिकेने आता सकारात्मक रील्सच्या माध्यमातून महापालिकेकडून केली जात असलेली कामे नागरिकांसमोर मांडण्याचा निर्णय घेतला आहे.
आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर शहर स्वच्छता व सौंदर्यावर भर दिला जाणार आहे. त्या अनुषंगाने स्वच्छता, होर्डिंग्ज व अतिक्रमण मुक्त शहराला प्राधान्य दिले जाणार आहे. त्याबाबत केलेल्या कारवाई तसेच कार्यवाहीचे रील्स तयार करून ते महापालिकेच्या सोशल मीडियाच्या प्लॅटफॉर्मवर अपलोड केले जाणार असून, त्यासाठी सोशल मीडिया ॲडव्हायझर म्हणून दीक्षा मारू यांची नियुक्ती करण्यात आल्याचे आयटी विभागाच्या उपायुक्त संगीता नांदूरकर यांनी सांगितले.
नागरिकांकडून येणाऱ्या तक्रारींचे निराकरण केल्यानंतर तसेच नागरी समस्यांविषयी कर्मचाऱ्यांकडून चांगली कामगिरी पार पाडल्यास त्याविषयीची माहिती लोकांपर्यंत पोहोचवण्याच्या उद्देशाने उपक्रम हाती घेतला जाणार असून, त्याची तयारी झाली आहे.
संगीता नांदूरकर, उपायुक्त आयटी विभाग, मनपा