

नाशिक : महापालिका निवडणुकीसाठी अंतिम प्रभागरचना जाहीर झाल्यानंतर आता प्रभागनिहाय मतदारयाद्या तयार करण्याची प्रक्रिया निवडणूक शाखेने सुरू केली आहे. यासाठी ३१ पथके स्थापन करण्यात आली असून एका पथकात चार ते पाच कर्मचाऱ्यांचा समावेश करण्यात आला आहे. या पथकांवर विभागीय अधिकारी हे क्षेत्रीय निवडणूक अधिकारी म्हणून नियुक्त करण्यात आले आहेत. ५ नोव्हेंबर पर्यंत प्रभागनिहाय याद्या तयार केल्या जाणार असून त्या ६ नोव्हेंबरला प्रसिद्ध केल्या जाणार असल्याची माहिती प्रशासन उपायुक्त लक्ष्मीकांत साताळकर यांनी दिली आहे.
प्रभागरचनेपाठोपाठ मतदार यादी तयार करण्याचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. मतदारयादी जाहीर करताना १ जुलै २०२५ पर्यंत नोंदविण्यात आलेल्या मतदारांची संख्या ग्राह्य धरली जाणार आहे. आता विधानसभा निवडणुकीच्या मतदारयादीचे प्रभागनिहाय विभाजन केले जाणार आहे. त्यानुसार निवडणूक आयोगाने १४ ऑक्टोबर ते १० डिसेंबरपर्यंत मतदारयाद्यांच्या कार्यक्रम जाहीर केला आहे. यासाठी विधानसभा निवडणूक २०२४ साठी निश्चित केलेली मतदारयादी अंतिम करण्यात आली असून, त्यात वेळोवेळी झालेल्या मात्र १ जुलैपर्यंतच्या अद्ययावत याद्यांचे प्रभागनिहाय विभाजन केले जाईल. शहरांमध्ये पंचवटी, नाशिकरोड, सिडको, सातपूर, नाशिक पूर्व आणि पश्चिम अशा सहा विभागांत ३१ प्रभागांची विभागणी करण्यात आली असून मतदार याद्यांच्या विभाजनासाठी ३१ पथके स्थापन करण्यात आली आहेत.
प्रत्येक पथकात तीन कर्मचारी, एक बांधकाम विभागाचा उपअभियंता, एक नगररचना विभागाचे अधिकारी असणार आहे. त्यांच्यावर सहा विभागीय अधिकारी हे क्षेत्रीय अधिकारी म्हणून नियुक्त करण्यात आले असून ५ नोव्हेंबर पर्यंत प्रभागनिहाय मतदार याद्या तयार केल्या जाणार आहे. ६ नोव्हेंबरला निवडणूक आयोगाच्या आदेशान्वये हरकती व सूचनांसाठी या याद्या प्रसिद्ध केल्या जाणार असल्याची माहिती साताळकर यांनी दिली आहे.
४२ हजार मतदारांचा प्रभाग
मतदारयादी जाहीर करताना १ जुलै २०२५ पर्यंत नोंदविण्यात आलेल्या मतदारांची संख्या ग्राह्य धरली जाणार आहे. लोकसंख्येनुसार शहरातील १३.६० लाख मतदारांची ३१ प्रभागांमध्ये विभागणी केली जाणार असून, साधारणपणे ४० ते ४२ हजार मतदारसंख्येचा एक प्रभाग अस्तित्वात येणार आहे.