

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
सध्या प्रचार जोमात आला असला तरी, पक्षाच्या अधिकृत उमेदवारांना बंडोबांची भीती सतावत आहे. त्यामुळे बंडोबांना थंड कसे करता येईल, यासाठी अजूनही प्रयत्न सुरूच आहेत. स्थानिक नेत्यांकडून मनधरणीसाठी फोनवर फोन केले जात असले तरी, बंडोबा माघारीचे नाव घेण्यास तयार नसल्याने पक्षाच्या अधिकृत उमेदवारांची डोकेदुखी वाढली आहे.
नाशिकमध्ये सर्वच प्रमुख पक्षांना बंडखोरीचे ग्रहण लागले आहे. विशेषतः भाजपमध्ये बंडखोरीचा विस्फोट झाल्याचे दिसून आले. यातील काहींना शांत करण्यात पक्षाला यश आले असले तरी, बरेच बंडोबा निवडणुकीच्या रिंगणात अपक्ष उमेदवारी करीत आहेत. यात काही माजी नगरसेवकांचा देखील समावेश असल्याने, पक्षाच्या अधिकृत उमेदवारांसमोर मोठे आव्हान निर्माण झाले आहे. सध्या प्रचार शिगेला पोहोचला आहे.
मात्र, प्रभागात पक्षाच्या अधिकृत उमेदवारांप्रमाणेच बंडखोर अपक्षांकडून देखील प्रचारात आघाडी घेतल्याने, अधिकृत उमेदवारांची धाकधूक वाढत आहे. याशिवाय ज्या स्थानिक नेत्यांवर प्रभागांची जबाबदारी दिली आहे, तेदेखील गणित बिघडण्याच्या भीतीने बंडोबांना थंड करण्यासाठी कसोशीने प्रयत्न करीत आहेत. त्यासाठी फोनवर फोन केले जात आहेत.
प्रभागातील प्रतिष्ठित नागरिकांच्या मदतीने मध्यस्थी करण्याचा प्रयत्नही केला जात आहे. याशिवाय भेटीगाठीचे नियोजन केले जात आहेत. त्यामुळे बंडोबांचे बंड थंड होऊन पक्षाच्या अधिकृत उमेदवारांना ते पाठिंबा देणार काय? हे बघणे महत्त्वाचे ठरणार आहे.
आमदारकीचे आमिष
एका बड्या पक्षाच्या स्थानिक नेत्यांनी बंडोबाला थेट आमदारकीचे आमिष दाखविले आहे. तुम्ही पक्षाच्या अधिकृत उमेदवाराला पाठिंबा जाहीर करा. त्याच्या प्रचारात सक्रिय व्हा, तुम्हाला पक्षाकडून विधान परिषदेवर संधी दिली जाईल, असे आमिष दाखविले. मात्र, या बंडोबाने कुठल्याही आमिषाला बळी न पडता, प्रचाराला आणखी वेग दिला आहे.