

दाबोळी : भारत बलाढ्य सागरी राष्ट्र म्हणून उदयास येत आहे. हिंदी महासागर क्षेत्रामध्ये स्थिरता, सहकार्य व नियमाधारित व्यवस्था सुनिश्चित करण्यात भारताची भूमिका दिवसेंदिवस महत्त्वाची होत चालली असल्याचे प्रतिपादन संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी येथे केले. दरम्यान, भारताकडे वाकड्या नजरेने पाहिल्यास तुमचा नकाशा बदलून टाकू, असा इशाराही त्यांनी नाव न घेता पाकिस्तानला दिला आहे.
गोवा शिपयार्डने भारतीय तटरक्षक दलासाठी बांधलेल्या दोन मालिकेतील पहिले व भारतीय तटरक्षक दलाचे सर्वात मोठे प्रदूषण नियंत्रण जहाज ‘समुद्र प्रताप’ भारतीय तटरक्षक दलाच्या ताफ्यामध्ये सामावून घेण्याच्या सोहळ्यात संरक्षणमंत्री राजनाथ सिंह बोलत होते. यावेळी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, केंद्रीय राज्यमंत्री श्रीपाद नाईक यांच्यासह अन्य नेते आणि भारतीय तटरक्षक दलाचे व गोवा शिपयार्डचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. मंत्री राजनाथ सिंह म्हणाले, नौदल, भारतीय तटरक्षक दलांची जहाजे भारताच्या सार्वभौमत्वाची, जनतेच्या विश्वासाची व सशस्त्र दलांच्या अपेक्षा व गरजांची प्रतीके आहेत.
1. 114.5 मीटर लांबीच्या या जहाजात 60 टक्के स्वदेशी घटकांचा समावेश
2. भारतीय तटरक्षक दलाचे पहिले स्वदेशी बनावटीचे हे प्रदूषण नियंत्रण जहाज
3. जहाजाचे वजन 4,200 टन आहे आणि त्याचा वेग 22 नॉटस्पेक्षा जास्त