

नाशिक : निखिल रोकडे
महानगरपालिका निवडणूक सध्या अंतिम टप्प्यात पोहोचली असून, शहरातील राजकीय वातावरण अक्षरशः तापले आहे. प्रत्येक उमेदवार मतदारांच्या दारात उभा राहून विकासाची स्वप्ने दाखवत आहेत. रस्ते, पाणी, स्वच्छता, सुरक्षा, रोजगार यांसह मोठमोठ्या घोषणा हवेत झुलत आहेत. मात्र, या आश्वासनांपैकी किती प्रत्यक्षात उतरतील, याची शंभर टक्के खात्री एकाही मतदाराला नाही, हीच खरी शोकांतिका आहे. निवडणूक संपली की, आश्वासनांचे फलक उतरतात आणि मतदार पुन्हा पुढील निवडणुकीपर्यंत प्रतीक्षेत राहतो हा अनुभव नवा नाही.
हीच अवस्था अलीकडे मुक्या जनावरांच्या बाबतीतही दिसून येत आहे. काही महिन्यांपूर्वी नाशिक शहर व परिसरात बिबट्यांच्या दहशतीने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. बिबट्याच्या हल्ल्यांमध्ये दोन चिमुकल्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. भोसला मिलिटरी स्कूल परिसरात बिबट्या शिरल्यानंतर मोठे रेस्क्यू ऑपरेशन राबवावे लागले. शहरात बिबट्यांचा वावर वाढण्यामागे जंगल परिसरात भक्ष्याची कमतरता हे प्रमुख कारण असल्याचे तज्ज्ञांनी वारंवार सांगितले.
याच पार्श्वभूमीवर बिबट्या नागरी वस्तीत येऊ नये, यासाठी शासनस्तरावर बैठकांचा धडाका सुरू झाला. अखेर वनमंत्र्यांकडून एक मोठी आणि बिबट्यांना लाडकी वाटावी अशी घोषणा ‘जंगल परिसरात तब्बल एक कोटी रुपयांच्या बकऱ्या सोडल्या जातील, जेणेकरून बिबट्याला त्याचे भक्ष्य जंगलातच उपलब्ध होईल आणि तो शहरांकडे फिरकणार नाही’ ही घोषणा ऐकून नागरिकांनी क्षणभर सुटकेचा श्वास घेतला. पण दिवस उलटले, आठवडे गेले, महिने सरले आणि प्रत्यक्षात त्या घोषणेची अंमलबजावणी कुठेच दिसली नाही.
इथेच प्रश्न उभा राहतो जेथे मतदारांना दिली जाणारी आश्वासने पूर्ण होतील की नाही, याची खात्री नसते, तेथे मुक्या जनावरांच्या नशिबी तरी काय? बिबट्यांसाठी जाहीर केलेल्या बकऱ्याही प्रत्यक्षात फक्त ‘आश्वासनांचे गाजर’ ठरल्या की काय, अशी चर्चा आता उघडपणे रंगू लागली आहे. माणसांप्रमाणेच मुक्या जनावरांनाही केवळ घोषणांच्या पातळीवर दिलासा देण्यात आला का, असा सवाल उपस्थित होत आहे.
निवडणुकीच्या रणधुमाळीत मतदारांचे अमूल्य मत मिळवण्यासाठी उमेदवारांमध्ये चुरस सुरू आहे. भविष्यात ही आश्वासने पूर्ण करताना किती अडचणी येतील, निधी कुठून येईल, याचा विचार करण्याइतका वेळही कुणाकडे नाही. ‘आत्ता मत मिळवा, नंतर पाहू’ अशीच मानसिकता सर्वत्र दिसते. मात्र, याचा परिणाम केवळ मतदारांवरच नाही, तर शहराच्या सुरक्षेवर, पर्यावरणावर आणि मुक्या जीवांच्या अस्तित्वावरही होतो, हे विसरून चालणार नाही.
मतदारांनी जागरूकपणे राहण्याची गरज
नाशिककरांनी आता सजग होण्याची वेळ आली आहे. आश्वासनांच्या गोड शब्दांपलीकडे जाऊन कृती, अंमलबजावणी आणि जबाबदारी यांचा जाब विचारण्याची गरज आहे. अन्यथा निवडणुका येतील आणि जातील, घोषणांची खैरात सुरूच राहील, पण प्रत्यक्षात विकास, सुरक्षा आणि संवेदनशीलतेचा प्रश्न मात्र कायम अनुत्तरितच राहील. कारण शेवटी, आश्वासनांचे गाजर हे फक्त मतदारांपुरते मर्यादित राहत नाहीत ते मुक्या जनावरांच्या नशिबातही येते, हीच या व्यवस्थेची खरी शोकांतिका आहे.