

नाशिकरोड :नाशिक महापालिकेच्या निवडणुकीमध्ये प्रेस कामगारांचे मतदान निर्णायक ठरणार आहे. प्रेस कामगारांमधून ज्या उमेदवारांचा सूर बाहेर पडेल ते नगरसेवक होतात, अशी चर्चा आहे.
नाशिकरोडची अर्थव्यवस्था मोठ्या प्रमाणावर इंडिया सिक्युरिटी प्रेस व करन्सी नोट प्रेसवर अवलंबून आहे. हजारो प्रेस कामगार हे नाशिकरोड परिसरामध्ये स्थायिक झालेले आहे. या दोन्ही कारखान्यांचे वैशिष्ट्य म्हणजे खासदारकी, आमदारकी, नगरसेवकांची निवडणूक असो अथवा नाशिकरोड देवळाली व्यापारी बँकेची निवडणूक असो, प्रत्येक निवडणुकीचे केंद्रबिंदू हे इंडिया सिक्युरिटी प्रेस व करन्सी नोट प्रेस असते. आजपर्यंत अनेक नेते घडवण्याचं काम येथील कामगारांनी केले आहे.
येथील कामगारांची जी चर्चा असते ती जिल्हाभर जाते आणि त्यामुळे कायमच निवडणुकीच्या वेळेस हे दोन्ही कारखाने केंद्रबिंदू ठरतात. आता महापालिका निवडणुकीतही प्रेस कामगारांचे मतदान निर्णायक राहणार आहे. येथील कामगार संघटना कुठल्याही राजकीय पक्षाशी संलग्न नाहीत. त्यामुळे प्रत्येक कामगाराला कुठल्याही पक्षाला मतदान करण्याचा अधिकार आणि स्वातंत्र्य आहे.
प्रेस कामगारांचे नेते जगदीश गोडसे म्हणाले की, नाशिकरोडची अर्थव्यवस्था ही प्रेसवर अवलंबून असल्याने प्रत्येकाला दोन्ही प्रेसचा अभिमान आहे. सामाजिक कार्यात प्रेस कामगारांचा सहभाग असतो. आमची संघटना राजकीय पक्षाशी संलग्न नसल्याने प्रत्येकाला आपले मतदान करण्याचे स्वातंत्र्य आहे. पूर्वीपासून चालू असलेली ही परंपरा आम्ही सुद्धा जोपासण्याचे काम करतोय.