

नाशिक : महापालिका निवडणुकीसाठी चारसदस्यीय प्रभागरचना तयार करण्यात आली आहे. त्यामुळे प्रत्येक प्रभागात चार नगरसेवक निवडून द्यावे लागणार असल्याने मतदारांना चार वेळा मतदान करावे लागणार आहे. मतदारांच्या सुविधेसाठी प्रभागातील प्रत्येक जागेच्या मतदानासाठी मतपत्रिकांचा रंग वेगळा असणार आहे. पांढरा, गुलाबी, पिवळ्या अन् निळ्या रंगाच्या मतपत्रिका असणार आहेत.
नाशिक महापालिकेसाठी येत्या 15 जानेवारीला निवडणूक होत आहे. 16 जानेवारीला मतमोजणीद्वारे निकाल जाहीर केला जाणार आहे. प्रभागासाठी मतदान करताना मतदारांना चार मते द्यावी लागणार आहेत. मतदारांच्या सुविधेसाठी प्रत्येक जागेसाठी ईव्हीएमवरील मतपत्रिकेचा रंग वेगवेगळा असणार आहे. जेव्हा दीर्घ असा बीपचा आवाज येईल तेव्हाच तुमची मतदान प्रक्रिया पूर्ण झाली असे समजावे, असेही निवडणूक कार्यालयाकडून कळविण्यात आले आहे.
प्रभाग क्रमांक 1 ते 31 करिता बटण दाबल्यानंतर उमेदवारांच्या समोरील यंत्रावरील लाल लाइट लागेल, मात्र बीप असा आवाज येणार नाही. मात्र शेवटच्या चौथ्या जागेसाठी बटण दाबल्यावर दीर्घ असा बीप आवाज येईल. जर मतदाराला मतपत्रिकेवरील नमूद कोणताही उमेदवार पसंत नसेल तर प्रत्येक जागेसाठी नोटा हा पर्यायही उपलब्ध असणार आहे.
तुम्हाला कोणत्याही राजकीय पक्षाचा उमेदवार आवडत नसेल आणि तुम्हाला त्यांच्यापैकी कुणालाही मत द्यायचे नसेल तर तुम्ही काय कराल? त्यासाठी निवडणूक आयोगाने एक व्यवस्था केली आहे. त्यावेळी तुम्ही नोटा बटण दाबून तुमचा निषेध नोंदवू शकता, असे निवडणूक कार्यालयातर्फे सुचित करण्यात आले आहे.
मतपत्रिकांचा रंग असा असणार
अ - जागेसाठी पांढरा रंग
ब - जागेसाठी फिका गुलाबी रंग
क - जागेसाठी फिका पिवळा रंग
ड - जागेसाठी फिका निळा रंग