

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
महापालिका निवडणुकीसाठी नियुक्त करण्यात आलेले दहा हजार शासकीय तसेच निमशासकीय कार्यालयांतील अधिकारी व कर्मचारी टपाली मतपत्रिकांद्वारे मतदानाचा हक्क बजावणार आहेत.
यासाठी संबंधित अधिकारी-कर्मचारी कोणत्या प्रभागातील मतदार आहेत, यासंदर्भातील माहिती बुधवार (दि. ७) पर्यंत संबंधित निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे सादर करण्याचे निर्देश प्रशासनातर्फे देण्यात आले आहेत. येत्या १५ जानेवारी रोजी नाशिक महापालिकेच्या निवडणुकीसाठी मतदान होत आहे. त्या अनुषंगाने महापालिका प्रशासनाकडून निवडणुकीची तयारी सुरू आहे.
निवडणूक प्रक्रियेसाठी महापालिकेने मनपा कर्मचाऱ्यांसह इतरही शासकीय आस्थापनांमधील सुमारे दहा हजार अधिकारी-कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली आहे. संबंधित कर्मचारी निवडणूक प्रक्रियेचा एक भाग असल्याने त्यांच्याकडून टपाली मतदान अर्थात, पोस्टल बॅलेट पेपरवर त्यांचे मतदान घेतले जाते. त्यासाठी संबंधित कर्मचारी व अधिकाऱ्यांना पोस्टल बॅलेट पेपर वितरित करण्यात आले आहेत.
अशा सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी आपला पी. बी. १ फॉर्म पूर्णपणे व अचूक भरून आपल्या मतदान असलेल्या प्रभागाच्या निवडणूक अधिकाऱ्याकडे ७ जानेवारीपर्यंत जमा करणे बंधनकारक आहे. निर्धारित मुदतीत पी. बी. १ फॉर्म सादर न झाल्यास टपाली मतदानाशी संबंधित पुढील कार्यवाहीमध्ये अडचणी येण्याची शक्यता असून,
त्याची सर्वस्वी जबाबदारी संबंधित अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची राहील, अशी स्पष्ट सूचना मनपाकडून देण्यात आली आहे. ही बाब अत्यंत महत्त्वाची असल्याने सर्व संबंधितांनी गांभीर्याने लक्ष देऊन वेळेत आवश्यक ती कार्यवाही करावी, असे आवाहन करण्यात आले आहे. महापालिकेने दहा हजार पोस्टल बॅलेट पेपरची मागणी केली होती.
10 तारखेला मतपत्रिकांचे वाटप
पीबी फॉर्म निवडणूक निर्णय अधिकाऱ्याकडे जमा केल्यानंतर १० तारखेला संबंधित कर्मचाऱ्यांना मतपत्रिका दिली जाणार आहे. मतपत्रिकेवर आवश्यक ती पूर्तता करून मतपत्रिका १४ जानेवारीपर्यंत पुन्हा आपापल्या निवडणूक अधिकाऱ्याकडे जमा करावयाची आहे. पीबी फॉर्ममध्ये संबंधित कर्मचारी, अधिकाऱ्याकडून नाव, ठिकाण, प्रभाग क्रमांक, मतदार क्रमांक, ओळखपत्र यासह आवश्यक स्वरूपाची संपूर्ण माहिती भरून घेतली जाते.