

नाशिकमध्ये निवडणूक प्रचाराला उत्सवी स्वरूप
ओवाळणीच्या नावाखाली मतदारांना थेट आर्थिक लाभ
एका घरात दिवसभरात १२ ते १६ उमेदवारांची भेट
सोशल मीडियावर रील्सद्वारे उमेदवारांची प्रतिमा उजळवण्याचा प्रयत्न
नाशिक : निखिल रोकडे
महापालिका निवडणूक पार्श्वभूमीवर प्रचाराचा रणसंग्राम अंतिम टप्प्यात पोहोचला असून, यंदाचा प्रचार केवळ राजकीय न राहता चक्क उत्सवी स्वरूप धारण करताना दिसत आहे. मतदानाच्या दिवशी आर्थिक लाभाच्या घटना यापूर्वीही समोर आल्या आहेत. मात्र, सध्या मतदानाआधीच प्रचारादरम्यानच मतदारांना थेट आर्थिक लाभ होत असल्याचे चित्र शहरात दिसत आहे.
उमेदवार घरोघरी प्रचारासाठी येत असताना मतदारांकडून त्यांना ओवाळले जात असून, त्या बदल्यात ओवाळणी स्वरूपात रक्कम दिली जात असल्याने मतदारांची चांगलीच चंगळ सुरू आहे.
परंपरेनुसार कोणाला ओवाळल्यानंतर ओवाळणी टाकण्याची रीत आहे. याच प्रथेचा वापर सध्या निवडणूक प्रचारात होत असून, उमेदवारांकडून १०० ते ५०० रुपयांपर्यंतची रक्कम ओवाळणीच्या स्वरूपात दिली जात असल्याची चर्चा आहे. अनेक प्रभागांमध्ये एका वेळी एकाच पक्षाचे चार उमेदवार प्रचारासाठी फिरत असल्याने दिवसभरात एका घरात किमान १२ ते १६ उमेदवारांची भेट होत आहे. त्यामुळे काही मतदारांना एका दिवसात अनेक वेळा ओवाळणीचा लाभ मिळत असून, त्यातून लक्षणीय आर्थिक फायदा होत आहे.
मनपा निवडणुकीत अनेक प्रभागांमध्ये महत्त्वाची ठरत आहे. घरोघरी प्रचार करतान ओवाळणी, सत्कार, हस्तांदोलन किंव नागरिकांच्या प्रतिक्रिया मोबाइल कॅमेऱ्यात टिपल्या जात असून, हेच क्षण रील्सच्य माध्यमातून सोशल मीडियावर झळकत आहेत. घराघरांतून मिळणारा सन्मान आणि लोकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद अश कॅप्शनखाली हे व्हिडिओ व्हायरल होत असून, त्यातून उमेदवारांची प्रतिम उजळविण्याचा प्रयत्न सुरू आहे.
भाषणांपेक्षा प्रतिमा निर्माण करण्यावर भर
यंदाच्या महापालिका निवडणुकीत पारंपरिक भाषणांपेक्षा प्रतिमा निर्माण करण्यावर अधिक भर दिला जात आहे. भावनिक, सांस्कृतिक आणि डिजिटल माध्यमांचा संगम साधत प्रचाराची नवी शैली आकार घेत आहे. निकाल काहीही लागो, विजयी कोणीही ठरो वा पराभूत, मात्र या संपूर्ण निवडणूक प्रक्रियेत मतदारांची चांगलीच चंगळ झाली आहे, अशी चर्चा सध्या नाशिकच्या राजकीय वर्तुळात रंगत आहे.