

नाशिक : अतितत्काळ हद्द कायम जमीन मोजणीचा नकाशा देण्यासाठी 35 हजार रुपयांची लाच मागून ती स्वीकारताना निफाडच्या भूमिअभिलेख कार्यालयातील भूकरमापकास नाशिकमध्ये लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले. या कारवाईमुळे महसूल यंत्रणेत खळबळ उडाली आहे.
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) रचलेल्या सापळा कारवाईत निफाडच्या उपअधीक्षक, भूमिअभिलेख कार्यालयातील भूकरमापक दिनेश शिवनाथ झुंजारे (वय 40) यास 35 हजार रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडण्यात आले आहे.
याबाबत एसीबीकडून मिळालेल्या माहितीनुसार, मूळ तक्रारदार राहुल ढोमसे यांच्या वहिनी प्रतिभा मंगलसिंग साळुंखे (ढोमसे) यांच्या नावावरील मौजे गोरठाण येथील शेतगट क्रमांक 136 मधील 57 आर क्षेत्राची अतितत्काळ (द्रुतगती) हद्द कायम जमीन मोजणी करून नकाशाची प्रत मिळण्यासाठी निफाडच्या उपअधीक्षक, भूमिअभिलेख कार्यालयात अर्ज करण्यात आला होता. त्यानुसार 17 सप्टेंबर 2025 रोजी पंचांच्या उपस्थितीत मोजणी करण्यात आली; मात्र त्यानंतर नकाशाची प्रत देण्यात आली नाही.
वारंवार संपर्क साधल्यानंतरही उडवाउडवीची उत्तरे देत काम प्रलंबित ठेवल्यानंतर 6 जानेवारी 2026 रोजी निफाडच्या उपअधीक्षक, भूमिअभिलेख कार्यालयातील भूकरमापक दिनेश शिवनाथ झुंजारे (वय 40) याने तक्रारदारास फोन करून नकाशा तयार असून, तो देण्यासाठी 35 हजार रुपये आणण्याची मागणी केली व पिंपळगाव बसवंत येथे भेटण्यास बोलावले. लाच देण्याची इच्छा नसल्याने तक्रारदाराने त्याच दिवशी एसीबी नाशिक कार्यालयात तक्रार दाखल केली.
पडताळणीअंती मागणी सिद्ध झाल्यानंतर 7 जानेवारीला सकाळी 9.35 वाजता आडगाव शिवारातील हॉटेल जत्रा पॉइंट येथे येवले अमृततुल्य चहा दुकानाजवळ सापळा रचण्यात आला. तेथे झुंजारे याने तक्रारदाराकडून 35 हजार रुपयांची लाच पंचांसमक्ष स्वीकारताच त्याला ताब्यात घेण्यात आले. ही कारवाई पोलिस निरीक्षक अमोल वालझाडे यांच्या पथकाने केली. याप्रकरणी आडगाव पोलिस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम अन्वये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. कोणत्याही लोकसेवकाकडून लाच मागितली गेल्यास त्वरित लाचलुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधण्याचे आवाहन एसीबीने नागरिकांना आवाहन केले आहे.
सहा महिन्यांपूर्वी याच कार्यालयात एकास अटक
निफाड : सहा महिन्यांपूर्वी याच कार्यालयातील एका शिपायास साडेतीन लाख रुपयांची लाच घेताना लाचलुचपत विभागाने रंगेहाथ पकडले होते. त्या प्रकरणाची चर्चा थंड होत नाही तोच पुन्हा याच कार्यालयात दुसरी घटना घडली होती.