

नाशिक : महापालिका निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या 735 उमेदवारांपैकी तब्बल 35 सर्वपक्षीय उमेदवार कोट्यधीश असल्याचे समोर आले आहे. सात वर्षांत या माजी नगरसेवकांच्या संपत्तीत दुपटी-तिपटीने वाढ झाल्याचे चित्र आहे. यातील काही उमेदवार गर्भश्रीमंत तर, काही उमेदवारंकडे लाख रुपयांचे मोबाइल आहेत. लखपती उमेदवारांचाही आकडा शंभराच्या वर आहे.
महापालिकेच्या निवडणुकीत एकूण 735 उमेदवार रिंगणात उतरले आहेत. निवडणूक लढण्यासाठी उमेदवारांना निवडणूक आयोगाकडे आपल्या संपत्तीचे विवरणपत्र देणे बंधनकारक असते. आपल्याकडे असलेल्या चल आणि अचल संपत्तीसह कर्जाचे सविस्तर विवरण उमेदवारांकडून शपथपत्रावर आयोगाला सादर केले जाते. त्यात नाशिकच्या 735 उमेदवारांनी सादर केलेल्या शपथपत्रांनुसार 35 उमेदवार कोट्यधीश असल्याचे स्पष्ट झाले आहे.
कोट्यधीशांच्या यादीत भाजप उमेदवारांचा क्रमांक वरचा आहे. भाजपपाठोपाठ शिवसेना शिंदे गटाचा क्रमांक लागत असून, अपक्षांनीही कोटीच्या कोटी उड्डाणे केली आहेत. विशेष म्हणजे, या कोट्यधीश उमेदवारांमध्ये भाजपच्या 19 उमेदवारांचा समावेश आहे. त्या पाठोपाठ शिंदे गटाचे सहा कोट्यधीश उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. राष्ट्रवादीचे दोन, तर उबाठा गटाचेही दोन कोट्यधीश निवडणूक रिंगणात उतरले आहेत. तसेच 735 उमेदवारांमध्ये लखपती उमेदवारांचा आकडाही शंभराच्या वर आहे.
अपक्षांत जाधव आघाडीवर
अपक्ष उमेदवार शशी जाधव यांच्याकडे 43.28 कोटींची संपत्ती आहे. अपक्षांमधील सर्वाधिक श्रीमंत उमेदवार म्हणून त्यांची ओळख बनली आहे. अपक्ष आणि शिवसेना शिंदे गटाने पुरस्कृत केलेल्या माजी महापौर अशोक मुर्तडक यांच्याकडेही 4.98 कोटींची संपत्ती आहे.
प्रमुख कोट्यधीश उमेदवार
दीपाली गिते-130.30कोटी, संजय चव्हाण- 74.13 कोटी, शशिकांत जाधव- 43.28 कोटी, कल्पना चुंभळे- 41.79 कोटी, अजय बोरस्ते-40.87 कोटी, हिमगौरी आहेर-आडके- 27.29, राजेंद्र महाले- 26.04, मुकेश शहाणे- 21.53 कोटी, रिद्धीश निमसे- 20.99 कोटी, दिनकर पाटील-17.37 कोटी, संभाजी मोरुस्कर- 11.79 कोटी, प्रियंका माने- 11.42 कोटी, योगिता हिरे- 10.05 कोटी, रंजना भानसी 9 कोटी, मच्छिंद्र सानप 7.89 कोटी, प्रवीण तिदमे- 7.09 कोटी, डॉ. हेमलता पाटील-7.05 कोटी, सुधाकर बडगुजर 6.54 कोटी.