Nashik Municipal Election : संपत्ती जमविण्यात उमेदवारांची कोटीच्या कोटी उड्डाणे

प्रतिज्ञापत्रातून समोर आले संपत्तीचे आकडे
Nashik municipal election candidates wealth
संपत्ती जमविण्यात उमेदवारांची कोटीच्या कोटी उड्डाणेpudhari photo
Published on
Updated on

नाशिक : नगरसेवक पदासह विविध पदे भूषविलेल्या महापालिका निवडणूक रिंगणातील उमेदवारांच्या संपत्तीत 2017 ते 2025 दरम्यान लक्षणीय आणि सामान्यांचे डोळे विस्फारतील अशी वाढ झाली आहे. निवडणूक अर्जासोबत सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रातून उमेदवारांच्या संपत्तीचे हे आकडे समोर आले आहेत.

महापालिकेत विरोधी पक्षनेते पद भूषविलेले शिवसेनेचे उपनेते अजय बोरस्ते, भाजपचे माजी नगरसेवक आणि सध्या अपक्ष निवडणूक रिंगणात असलेले शशिकांत जाधव, सातपूरमधील भाजप उमेदवार दिनकर पाटील, उबाठा महानगरप्रमुख प्रथमेश गिते, सिडकोतील भाजप उमेदवार सुधाकर बडगुजर यांनी संपत्ती जमविण्यात घेतलेली कोटीच्या कोटी उड्डाणे थक्क करणारी आहेत. कोट्यधीश असलेल्या या उमेदवारांचा फैसला आता जनतेच्या दरबारात 15 जानेवारीला मतदानाद्वारे होणार आहे.

Nashik municipal election candidates wealth
Nashik bribery case : लाचखोर दोन्ही पोलिस अधिकाऱ्यांचे निलंबन

बोरस्तेंच्या संपत्तीत सर्वाधिक 34.22 कोटींची वाढ

महापालिकेत विरोधी पक्षनेते पद भूषविलेले शिंदे गटाचे उपनेते अजय बोरस्ते संपत्ती जमविण्यात प्रथम क्रमांकावर असल्याचे दिसत आहेत. त्यांच्याकडे तब्बल 40.87 कोटींची संपत्ती आहे. 2017 ते 2025 या आठ वर्षांच्या काळात त्यांच्या संपत्तीत 34.22 कोटींची घसघशीत वाढ झाली.

2017 मध्ये बोरस्ते यांच्या नावावर 6.64 कोटींची संपत्ती होती. निवडणूक अर्जाबरोबर सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात स्वत: बोरस्ते यांनी नमूद केल्यानंतर 2025 मध्ये त्यांच्या संपत्तीचा आकडा 40.87 कोटींवर गेला. 54 वर्षे वयाच्या बोरस्ते यांनी प्रतिज्ञापत्रात उत्पन्नाचे साधन शेती व व्यापार दर्शविले आहे.

बोरस्ते यांच्याकडे 7.37 लाख रोख, 2.69 लाखांच्या ठेवी, 32 लाखांची फॉर्च्यूनर गाडी, 5 तोळे सोने अशी कुटुंबाच्या नावे 1.90 कोटींची जंगम, तर 38.96 कोटींची स्थावर अशी एकूण 40.87 कोटींची मालमत्ता आहे. 15.98 कोटींचे बँकेचे कर्जही त्यांच्या नावे आहे.

2017 च्या निवडणुकीत त्यांनी 6.64 कोटींची स्थावर व जंगम मालमत्ता असल्याचे जाहीर केले होते. दोन वर्षे किंवा त्याहून अधिक कालावधीसाठी शिक्षा होऊ शकेल, असा एसएससी नं. 2413/2024 क्रमांकाचा दावा त्यांच्याविरोधात नाशिक न्यायालयात दाखल आहे.

शशिकांत जाधव यांच्याकडे 43.28 कोटींची संपत्ती

भाजपशी बंडखोरी करत अपक्ष निवडणूक रिंगणात असलेले माजी नगरसेवक शशिकांत जाधव यांच्याकडे 43.28 कोटींची संपत्ती आहे. गेल्या आठ वर्षांत त्यांच्या संपत्तीत 23.80 कोटींची वाढ झाली.

2017 च्या निवडणुकीत जाधव यांनी स्थावर व जंगम मालमत्तेचा आकडा 19.48 कोटी दर्शविला होता. त्यांच्या संपत्तीत 122 टक्क्यांनी वाढ झाली. 60 वर्षे वयाचे जाधव यांचा इंजिनिअरिंग, लॉजिस्टिक्स व पर्यटन व्यवसाय आहे. जाधव यांच्याकडे पाच लाख रुपये रोख आहेत. सुमारे 61 लाखांची तीन चारचाकी वाहने, 22.49 लाखांचे 180 ग्रॅम सोने, खारघर येथे घर अशी कुटुंबाकडे 20.67 कोटींची मालमत्ता आहे.

22.60 कोटींची स्थावर मालमत्ता अशी एकूण 43.28 कोटींची मालमत्ता जाधव कुटुंबाच्या नावे आहे. त्याचप्रमाणे 9.79 कोटींचे बँकेचे कर्जही त्यांच्या नावावर आहे. जाधव हे जाधव पॅरेडाइज, जे. के. वेअरहाउसिंग प्रा. लि., एनएसजे ग्लोबल लॉजिस्टिक्स, स्टारबाइट्स न्यूट्री फूडस्‌‍ प्रा. लि. या कंपन्यांचे मालक आहेत. दोन वर्षांहून अधिक काळ शिक्षा होऊ शकेल, असा एकही दावा जाधव यांच्याविरोधात प्रलंबित नसल्याची माहिती प्रतिज्ञापत्रात नमूद करण्यात आली आहे.

प्रथमेश गिते 1.19 लाखांवरून 5.14 कोटींवर

भाजपच्या सत्तेत उपमहापौर राहिलेले आणि सध्या शिवसेनेचे (उबाठा) महानगरप्रमुख असलेले माजी नगरसेवक प्रथमेश गिते यांनी 2017 च्या निवडणुकीत जेमतेम 1.19 लाखांची संपत्ती दर्शविली होती. 2025 मध्ये त्यांची संपत्ती 5.15 कोटींवर पोहोचली. गेल्या आठ वर्षांत गिते यांच्या संपत्तीत 5.14 कोटींची वाढ झाली आहे. संपत्तीवाढीचे प्रमाण 43 टक्के आहे. अवघे 34 वर्षे वयाच्या गिते यांनी प्रतिज्ञापत्रात आपला व्यवसाय व्यापार दर्शविला आहे.

एफवाय बीकॉम शिक्षण झालेल्या गिते यांच्यावर दोन वर्षांहून अधिक काळ शिक्षा होऊ शकेल, असा एकही खटला न्यायालयात प्रलंबित नसल्याचे प्रतिज्ञापत्रात नमूद केले आहे. गिते यांच्या नावे शेती नाही. एक लाख रुपये रोख रक्कम असलेल्या गिते यांच्या नावे 41 लाखांची चारचाकी गाडी, साडेतीन लाखांचे अडीच तोळे सोने आहे.

गिते यांनी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 5 लाख रुपये दर्शविले आहे. कुटुंबाकडील जंगम मालमत्ता 55.40 लाख, तर कुटुंबाकडील स्थावर मालमत्ता 4.60 कोटी दर्शविली आहे. अशी त्यांच्याकडे 5.15 कोटींची मालमत्ता आहे. त्यांच्या नावावर कुठल्याही बँकेचे कर्ज नाही. 2017 च्या निवडणुकीत गिते यांनी 53 हजार रुपयांची मालमत्ता व 66.350 रुपयेचे दायित्व जाहीर केले होते.

Nashik municipal election candidates wealth
Girish Mahajan : अयोध्येच्या धर्तीवर तपोवनात श्रीराम मंदिर उभारणार

पाटील कुटुंबाकडे 17.37 कोटींची मालमत्ता

65 वर्षीय दिनकर पाटील हे दहावी नापास आहेत. सातपूर विभागात वजन राखून असलेल्या पाटील यांच्यावर दोन वर्षांहून अधिक कालावधीसाठी कैदेची शिक्षा होईल, असा एकही गुन्हा नाही. ते 59,700 रुपये किमतीचे रिव्हॉल्व्हर बाळगतात हे विशेष. उत्पन्नाचे साधन म्हणून शेती व व्यापार असे प्रतिज्ञापत्रात पाटील यांनी नमूद केले आहे. त्यांच्याकडे दोन लाखांची रोख रक्कम आहे.

7.42 लाखांचे 55 ग्रॅम सोने नावावर असलेल्या पाटील यांच्या पत्नीकडे 22.95 लाखांचे 170 ग्रॅम सोने आहे. गंगापूर शिवारातील त्यांच्या मालकीची मिळकत त्यांनी भाडेतत्त्वावर दिली असून, 3.60 लाखांचे वार्षिक भाडे त्यांना मिळते. सर्वज्ञ बंगला नावाने स्वत:चे घर असलेल्या पाटील यांच्याकडे 11 कोटींची मालमत्ता आहे. पाटील यांच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 25.83 लाख आहे.

पाटील कुटुंबाकडे 2.52 कोटींची जंगम, तर 14.84 कोटींची स्थावर मालमत्ता आहे. अशाप्रकारे पाटील कुटुंबाकडे 17.37 कोटींची मालमत्ता आहे. त्याचबरोबर त्यांच्यावर 1.95 कोटींचे कर्ज आहे. 2024 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी 18 कोटींची मालमत्ता दर्शविली होती. 3.27 कोटींचे कर्ज असल्याचे नमूद केले होते. 2017 च्या निवडणुकीत 9.22 कोटींची मालमत्ता, तर 39.95 लाखांचे कर्ज असल्याचे प्रतिज्ञापत्रात नमूद केले होते.

बडगुजर कुटुंबही आहे कोट्यधीश

56 वर्षे वयाचे सुधाकर बडगुजर यांचा शेती व व्यापार हे उत्पन्नाचे साधन आहे. दहावीपर्यंत शिक्षण झालेल्या बडगुजर यांच्यावर दोन वर्षांहून अधिक कालावधीची कैद होऊ शकेल, अशा प्रकारचे सहा दावे विविध न्यायालयांत प्रलंबित आहेत. त्याशिवाय त्यांना आयपीसी 353 व 34 अन्वये व मुं. पो. ॲक्ट 37 (1) व 135 अन्वये जिल्हा न्यायालयाने दोषी ठरविले असून, त्यांनी विरोधात उच्च न्यायालयात अपील दाखल केलेले आहे.

बडगुजर आलिशान वाहनातून प्रवास करत असले, तरी त्यांच्या नावे दीड लाख किमतीचे चारचाकी वाहन आहे. 25 लाख किमतीचे 200 ग्रॅम सोने आहे. त्यांच्या पत्नीकडे 39 लाख रुपये किमतीचे 315 ग्रॅम सोन्याचे दागिने आहेत. त्यांच्या नावे नाशिकसह जळगाव येथे शेती आहे. बडगुजर यांच्याकडील जंगम मालमत्तेची किंमत 1.86 कोटी आहे.

बडगुजर यांच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 14.44 लाख इतके आहे. बडगुजर कुटुंबाकडे 2.42 कोटींची जंगम, तर 4.11 लाखांची स्थावर मालमत्ता आहे. बडगुजर कुटुंबीयांकडे 6.54 कोटींची मालमत्ता आहे. 2024 च्या विधानसभा निवडणुकीवेळी त्यांनी 1.79 कोटींची मालमत्ता जाहीर केली होती.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news