

नाशिक : सतीश डोंगरे
सध्या उमेदवारांकडून प्रचाराचा धुराळा उडवून दिला जात असून, रॅली, बैठका, चौकसभेतून जोरदार मोर्चेबांधणी सुरू आहे. मात्र, या साऱ्या राजकीय हालचालींसोबत एक वेगळाच ‘अदृश्य प्रचार’ सध्या चर्चेत आहे. होय, विजयाचा गुलाल उधळण्यासाठी उमेदवार मतपेटीच्या आधीच ‘कुंडली’ उघडून पाहात आहेत. यासाठी शहरातील प्रमुख ज्योतिषाचार्यांकडे उमेदवारांची रीघ असून, त्यांनी सुचविलेले दैवी तोडगे, तंत्रमंत्र तसेच विविध पूजा जोरात सुरू आहेत.
तब्बल 9 वर्षांनंतर घेतल्या जात असलेल्या महापालिका निवडणूक रिंगणात अनेक रथी - महारथी नशीब आजमावत आहेत. शहरातील 31 प्रभागांतही तिरंगी आणि चौरंगी लढती होत असून, विजयासाठी प्रत्येक जण कसोशीने प्रयत्न करीत आहेत. मात्र, अनेकांच्या मनात धाकधूकही आहे. त्यामुळे मतपेटीअगोदर कुंडली जाणून घेण्यासाठी अनेक उमेदवार ज्योतिषाचार्यांचे उंबरठे झिजवत आहेत. प्रचाराचा प्रारंभ, प्रचाराचा वेग वाढवण्याचा मुहूर्त तसेच विजयाचा योग किती? आदी प्रश्नांची उत्तरे जाणून घेतली जात आहेत.
काही उमेदवारांकडून तर प्रचार साहित्य छापण्यापूर्वी तसेच बॅनर लावण्याचा मुहूर्तदेखील काढला जात आहे. ‘ग्रहमान अनुकूल आहे का? विरोधकांचा योग किती प्रभावी आहे? कोणत्या दिवशी सभा घेतली, तर फायदा होईल? याही प्रश्नांची उत्तरे ज्योतिषांकडून जाणून घेतली जात आहेत. त्यासाठी ज्योतिषाचार्यांना जन्मकुंडली, नावाची आद्याक्षरे, पक्षचिन्ह आणि मतदारसंघाचा तपशील सादर केला जात आहे.
ज्या उमेदवाराचे ग्रहमान नकारात्मक आहेत, त्या उमेदवारांना ज्योतिषाचार्यांकडून काही दैवी तोडगे सांगितले जात आहेत. तंत्र, मंत्र, यंत्र दिले जात आहेत. रत्नखडे परिधान करण्याचा सल्ला दिला जात आहे. याशिवाय धार्मिक पूजाही करण्याचा सल्ला दिला जात असल्याने, सध्या बहुतांश भागात विविध पूजांना वेग आला आहे. राजकारणात मेहनत, संघटन आणि मतदारांचा विश्वास महत्त्वाचा असतो, ही बाब जरी उमेदवारांना मान्य असली, तरी ‘नशीबाने साथ द्यायला हवी’ अशी भावना अनेकांची असल्याने उमेदवार ज्योतिषाचार्यांचे उंबरठे झिजवताना दिसून येत आहेत.
बगलामुखी, कामाख्य पूजा जोरात
राजकारणात बगलामुखी पूजेला अनन्यसाधारण महत्त्व असल्याची धारणा आहे. त्यामुळे अनेक उमेदवार विजयाचे गणित जुळविण्यासाठी ज्योतिषाचार्यांच्या सल्ल्यानुसार बगलामुखी पूजा करीत आहेत. याशिवाय कामाख्या पूजा, ग्रहांच्या पूजा करण्याबरोबरच विशिष्ट प्रकारच्या वनस्पती जवळ बाळगत आहेत. विजयाचे गणित जुळवण्यासाठी कुंडली शुद्ध करून घेतली जात आहे. याशिवाय, सात्विक अनुष्ठान, बटुक भैरव अनुष्ठान, दुर्गासप्तशती, नवचंडी, सहस्रचंडी यांसारखेही अनुष्ठान केले जात असल्याची माहिती समोर येत आहे.
प्रारंभी तिकीट मिळवण्यासाठी आणि आता विजयाचा गुलाल उधळता येईल काय? हे जाणून घेण्यासाठी अनेक उमेदवार येत आहेत. काहींचे ग्रह अनुकूल आहेत, तर ज्यांचे ग्रह प्रतिकूल आहेत, ते दैवी तोडगे घेत आहेत. विविध धार्मिक पूजेसह रत्नखडे, तंत्र-मंत्र-यंत्र, विशिष्ट प्रकारच्या वनस्पती उमेदवार घेत आहेत. राजकारणात बगलामुखी पूजेला महत्त्व असल्याने उमेदवारांकडून ही पूजा केली जात आहे. ज्यांच्या कुंडलीत राजयोग आहे, त्यांचा विजय निश्चित आहे.
नरेंद्र धारणे, ज्योतिषाचार्य