

नांदेड ः राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात एक मधचे गाव विकसित करण्यात येणार आहे. खादी ग्रामोद्योग महामंडळाकडे ही जबाबदारी सोपवण्यात आली असून नांदेड जिल्ह्यात मौजे भंडारवाडी (ता. किनवट) या गावाची मधाचे गाव म्हणून साकारण्यास निवड करण्यात आली आहे. येथे वर्षाकाठी 8 ते 9 क्विंटल मध संकलन होते. गावात प्राथमिक कामे झाली असून संनियंत्रण समितीचे अध्यक्ष जिल्हाधिकारी आहेत.
महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळाच्यावतीने राज्यात मधुपर्यटन, मधुमक्षिका पालन या थेट रोजगार मिळवून देणाऱ्या योजना राबवल्या जाणार आहेत. मंडळाचे अध्यक्ष रवींद्र साठे यांनी यासाठी पुढाकार घेतला आहे. नांदेड जिल्ह्यातील भंडारवाडी या गावाचा प्रस्ताव 2024 मध्ये शासनाकडे पाठवण्यात आला होता. त्यानंतर स्वतः रवींद्र साठे यांनी या गावाला भेट देऊन पाहणी केली. त्यानंतर प्रस्ताव मंजूर झाला असून याअंतर्गत 53 लक्ष रुपयांचा निधी सुद्धा प्राप्त झाला आहे. आणखी निधी लागल्यास तो उपलब्ध करुन देण्याची जबाबदारी जिल्हाधिकाऱ्यांवर सोपवण्यात आली आहे.
मौजे भंडारवाडी हे 470 लोकसंख्या असलेले गाव असून यापैकी 80 लोक या व्यवसायात अगोदर पासूनच आहेत. आणखी 30 जणांना पारंपरिक पद्धतीने मधमाशांना नुकसान न होता मध संकलनाचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे. यापूर्वीही अशा प्रकारचे प्रशिक्षण देण्यात आले होते. यासाठी संरक्षण पोशाख, शिडी, दोरी, भांडी आदी साहित्य सुद्धा देण्यात आले आहे. नव्या 30 लोकांना नव्याने किट देण्यात येणार असल्याचे मध निरीक्षक डी.एस. राऊतराव यांनी सांगितले.
या संकल्पनेअंतर्गत एक बैठक जिल्हाधिकाऱी कार्यालयात पार पडली असून येत्या 16 तारखेला आणखी एक बैठक होणार आहे. दरम्यान, दि. 26 जानेवारीपर्यंत गावातील कामे पूर्ण करण्याच्या सूचना शासनाकडून नुकत्याच निर्गमित झाल्या आहेत.
भंडारवाडी हे गाव सहस्रकुंड धबधब्यापासून 8 किलोमीटर अंतरावर असून मधाचे गाव म्हणून ते विकसीत करण्यात येणार आहे. त्यासाठी गावाच्या वेशीवर आकर्षक कमान उभारण्यात येणार आहे. गावात मधावर प्रक्रिया करणारे उद्योग उभारण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहेत. खुल्या बाजारात मध विक्री होईलच, परंतु शासनाच्या हमीवर खादी ग्रामोद्योग महामंडळ सुद्धा खरेदी करणार आहे. गावात ग्रा.पं.च्या मालकीच्या एका जुन्या इमारतीची डागडुजी व रंगरंगोटी करुन माहिती दालन सुरू करण्यात येणार आहे. एक सामायिक सुविधा केंद्र स्थापन करण्यात येणार असून येथे बॉटलिंग, लेबलिंग, पॅकिंग व उपउत्पादने तयार करण्यात येणार आहेत.
निवडणूक कर्तव्य
26 जानेवारीपर्यंत भंडारवाडी गावात अंतर्गत कामे मार्गी लावणे अपेक्षित होते. परंतु महापालिका निवडणुकीसाठी येथील कर्मचाऱ्यांना निवडणूक कर्तव्यावर नियुक्त करण्यात आल्याचे समजते. तरी देखील दहा दिवसांचे प्रशिक्षण गावात देण्यात येणार असल्याची माहिती आहे.
मधाचे गाव या संकल्पनेअंतर्गत भंडारवाडीची निवड करण्यात आली असून निधी सुद्धा प्राप्त झाला आहे. मार्च अखेरपर्यंत हा निधी ठराविक कामांवर खर्च करावयाचा आहे. मधाचे गाव विकसीत झाल्यानंतर गावात सेल्फी पॉइंट तयार करण्यात येणार आहे. मधप्रेमी व विद्यार्थी गावाला भेट देण्यासाठी येतील, असा विश्वास आहे.
संजय सारंगधर जिल्हा ग्रामोद्योग अधिकारी