

Nashik Municipal Corporation Election 2026 Results
नाशिक : नाशिक महापालिकेच्या सातव्या पंचवार्षिक निवडणुकीत अनेक धक्कादायक निकाल समोर आले आहेत. या निवडणुकीत माजी महापौर अशोक मुर्तडक यांच्यासह स्थायी समितीचे माजी सभापती सलीम शेख, शिवाजी गांगुर्डे, संजय साबळे, संजय चव्हाण यांच्यासह कारागृहातून निवडणूक लढविणारे रिपब्लिकन पक्ष (आठवले गट)चे जिल्हाध्यक्ष प्रकाश लोंढे, त्यांच्या स्नुषा दीक्षा लोंढे, भाजपचे दिनकर आढाव, संभाजी मोरूस्कर, भाजपचे बंडखोर शशिकांत जाधव, अरुण पवार, काँग्रेसच्या वत्सला खैरे, शिंदे गटाचे सूर्यकांत लवटे, तसेच माजी महापौर ॲड. यतीन वाघ यांच्या पत्नी हितेश वाघ यांना पराभवाचा धक्का सहन करावा लागला आहे.
प्रभाग क्रमांक १ मधील भाजपचे उमेदवार अरुण पवार यांना शिवसेनेचे नवखे उमेदवार प्रवीण जाधव यांनी पराभूत केले. प्रभाग ५ मधून भाजपने उमेदवारी नाकारल्याने अपक्ष निवडणूक रिंगणात उतरलेले व निवडणूक ऐन भरात आली असताना शिवसेना (शिंदे गटात) प्रवेश करून पाठिंबा मिळविलेले माजी महापौर अशोक मुर्तडक यांना पराभव सहन करावा लागला. भाजपचे उमेदवार माजी उपमहापौर गुरुमित बग्गा यांनी त्यांना पराभवाची धूळ चारली. प्रभाग १२ मधून भाजपच्या तिकिटावर निवडणूक लढविणारे स्थायी समितीचे माजी सभापती शिवाजी गांगुर्डे यांना शिवसेनेचे माजी नगरसेवक समीर कांबळे यांनी पराभूत केले. प्रभाग १० अ मधून अपक्ष निवडणूक लढविणाऱ्या भाजपचे बंडखोर शशिकांत जाधव यांना भाजपच्या विश्वास नागरे यांनी पराभूत केले. प्रभाग ११ अ मधून रिपब्लिकन पक्षाच्या दीक्षा लोंढे व प्रभाग ११ ड मधील प्रकाश लोंढे यांना पराभव पत्करावा लागला. या ठिकाणी अनुक्रमे भाजपच्या सविता काळे, भाजपचे नितीन (बाळा) निगळ यांचा विजय झाला. प्रभाग १२ मधून भाजपचे शिवाजी गांगुर्डे यांना शिवसेनेचे समीर कांबळे यांनी पराभवाची धूळ चारली आहे. तर प्रभाग १३ अ मधून माजी महापौर विनायक पांडे यांच्या स्नुषा अदिती पांडे यांनी काँग्रेसच्या ज्येष्ठ नगरसेविका वत्सला खैरे यांचा पराभव केला.
स्थायी समितीचे माजी सभापती, उबाठाचे उमेदवार संजय चव्हाण यांना प्रभाग १३ मधून गजानन शेलार यांचे पुतणे भाजप उमेदवार राहुल (बबलू) शेलार यांनी पराभूत केले आहे. प्रभाग १४ अ मधून स्थायी समितीचे माजी सभापती राष्ट्रवादी शरद पवार गटाचे उमेदवार संजय साबळे यांचा राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या जागृती गांगुर्डे यांनी पराभव केला आहे. प्रभाग १७ मधून भाजपचे ज्येष्ठ नगरसेवक दिनकर आढाव यांना मतविभागणीचा फटका बसला असून, उबाठाचे शैलेंद्र ढगे यांनी त्यांचा पराभव केला आहे. प्रभाग २० ड मध्ये भाजपचे ज्येष्ठ नगरसेवक संभाजी मोरूस्कर यांना शिवसेनेचे कैलास मुदलीयार यांनी पराभूत केले आहे. प्रभाग २१ ड मधून सूर्यकांत लवटे यांना पराभवाची धूळ चाखावी लागली आहे. मनसे व भाजपकडून नगरसेवक राहिलेले व यंदा प्रभाग ३० मधून राष्ट्रवादी काँग्रेसकडून उमेदवारी करणारे माजी सभागृह नेते सतीश सोनवणे यांचा भाजपचे अजिंक्य साने यांनी पराभव केला आहे.
निवडणुकीत आ. सीमा हिरे यांना धक्का बसला आहे. प्रभाग क्रमांक ७ ड मधून भाजप तिकिटावर निवडणूक रिंगणात असलेले आ. हिरे यांचे दीर योगेश (मुन्ना) हिरे यांचा शिवसेनेचे उपनेते अजय बोरस्ते यांनी तब्बल ६,१०२ मतांच्या फरकांनी पराभव केला. बोरस्ते यांना १३,०२२ मते मिळाली तर हिरे यांना ६,९२० मतांवर समाधान मानावे लागले आहे.
भाजपच्या माजी महापौर रंजना भानसी, माजी उपमहापौर गुरुमित बग्गा, स्थायी समितीच्या माजी सभापती हिमगौरी आहेर-आडके, सुरेश पाटील, सुधाकर बडगुजर, दिनकर पाटील, शाहू खैरे, सचिन मराठे, प्रशांत दिवे, शिवसेनेचे उपनेते अजय बोरस्ते, विलास शिंदे, प्रवीण तिदमे, कमलेश बोडके, रंजना बोराडे, राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या डॉ. हेमलता पाटील, उबाठाचे प्रथमेश गिते हे विजयी झाले आहेत