

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
नाशिक महापालिकेच्या ३१ प्रभागांतील १२२ जागांसाठी येत्या १५ जानेवारीला होत असलेल्या निवडणुकीसाठी १,५३२ उमेदवारांनी २,३५७ नामनिर्देशनपत्र दाखल केले आहेत. यात विविध राजकीय पक्षांच्या ५१८ उमेदवारांचा समावेश आहे.
राजकीय पक्षांबरोबरच १,०१४ अपक्षांनी अर्ज दाखल करत आव्हान उभे केले आहे. नाशिक महापालिकेची यंदाची राजकीयदृष्ट्या निवडणूक आव्हानात्मक ठरत आहे. या निवडणुकीसाठी सर्वच पक्षांत झालेली इच्छुकांची भाऊगर्दी डोकेदुखी ठरली.
विशेषतः भाजपमध्ये १२२ जागांसाठी १,०६७इच्छुकांनी उमेदवारीची मागणी केल्यानंतर एबी फॉर्म वाटपावरून झालेला राडा भाजपची नाचक्की करणारा ठरला. निष्ठावंत कार्यकर्ते आणि अलीकडेच पक्षात प्रवेश केलेल्या उमेदवारांतील संघर्ष निवडणूक कार्यालयाबाहेर उघडपणे दिसून आला. भाजपकडून ३३ आयारामांना संधी देण्यात आली.
वर्षानुवर्षे पक्षाचे काम करूनही उमेदवारी डावलली गेल्याने निष्ठावंत दुखावले. त्यामुळे भाजपसाठी महापालिकेची ही निवडणूक पक्षीय लढतीपेक्षा अधिक अंतर्गत संघर्ष, शक्तिप्रदर्शन आणि राजकीय गणितांची कसोटी ठरणार असल्याचे स्पष्ट होत आहे.
माजी महापौर अशोक मुर्तडक, शशिकांत जाधव, कमलेश बोडके, सतीश सोनवणे यांसारख्या दिग्गजांना उमेदवारी मिळाली नाही. या निवडणुकीसाठी २,३५७नामनिर्देशनपत्र दाखल केले गेले आहे. यात विविध राजकीय पक्षांकडूनच ५१८ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. निवडणूक मैदानात अपक्षही मागे नाहीत. १,०१४ अपक्षांनी अर्ज दाखल करत राजकीय पक्षांच्या उमेदवारांसमोर आव्हान उभे केले आहे.
राजकीय पक्षांची उमेदवार संख्या
भाजप - ११८ (प्रभाग १४ मध्ये उमेदवार नाही), शिवसेना (शिंदे गट) -८०, राष्ट्रवादी (अजित पवार) ४१, शिवसेना (ठाकरे गट)- ८२, राष्ट्रवादी (शरद पवार गट) ३१, मनसे ३४, आप ३५, माकप ९, काँग्रेस - २२, वंचित - ५५, रिपाई आठवले ३, रिपब्लिकन सेना (आनंदराज आंबेडकर) - १, एमआयएम - ७.
प्रभाग ३ अ साठी सर्वाधिक ६३ अर्ज
महापालिका निवडणुकीसाठी 'प्रभाग ३ अ' या नागरिकांच्या मागास प्रवर्गासाठी सर्वाधिक ६३ उमेदवारी अर्ज दाखल झाले. प्रभाग २१ अ ५५, प्रभाग २० अ-५३, प्रभाग २ अ- ५०, प्रभाग १४अ-४२, प्रभाग १ ब ४१, प्रभाग २२ अ- ४१, प्रभाग १४क- ४१, प्रभाग १३ ३६, प्रभाग १४ ड- ३६, प्रभाग १० अ- ३६, प्रभाग ११ ब ३५ अर्ज दाखल झाले आहेत.