

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
नाशिक शहरात गुन्हेगारीवर आळा घालण्यासाठी सुरू असलेल्या कारवाईत गंगापूर पोलिस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाला यश मिळाले. विनापरवाना गावठी कट्टा बाळगणाऱ्या व चोरीच्या मोबाइल प्रकरणातील तौफिक हाशमी, समीर अशोक गुंजाळ, फैजान शेख यांना अटक केली आहे.
त्यांच्याकडून गावठी कट्टा, जिवंत काडतूस, दुचाकी व अॅपल कंपनीचे दोन मोबाइल असा एकूण २ लाख ३७ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. गंगापूर पोलिस ठाण्याचे पोलिस कर्मचारी घनःश्याम भोये यांना माहिती मिळाली होती. कॅनॉल रोड (गंगापूर गाव) येथे सुला वाइन्सकडे जाणाऱ्या रस्त्यालगत दोन संशयित मोठ्या लोखंडी पाइपमध्ये बसले असून, त्यांच्याकडे गावठी कट्टा आहे.
ही माहिती वरिष्ठ पोलिस निरीक्षक मधुकर कड, पोलिस निरीक्षक (गुन्हे) काजल मोरे व गुन्हे शोध पथकाचे उपनिरीक्षक भारत पाटील यांना देण्यात आली. वरिष्ठांच्या मार्गदर्शनानुसार भारत पाटील व गुन्हे शोध पथकाने परिसरात सापळा रचत दुचाकीसह पाइपमध्ये लपलेल्या दोघांना ताब्यात घेत त्यांची झडती घेतली.
तौफिक इक्बाल हाशमी (रा. श्रमिकनगर) याच्या कमरेस एक गावठी कट्टा, जिवंत काडतूस जप्त केले. दुसरा संशयित समीर अशोक गुंजाळ (रा. गोवर्धन) यालाही अटक करण्यात आली. या प्रकरणी गंगापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. गावठी कट्टा व काडतूस मो. फैजान शेख (रा. संजीवनगर, अंबड) याच्याकडून खरेदी केल्याचे निष्पन्न झाल्याने त्यालाही अटक करण्यात आली.
तपासादरम्यान संशयितांनी गंगापूर रोड परिसरात पायी जाणाऱ्या नागरिकांकडून बळजबरीने दोन आयफोन हिसकावून नेल्याचे निष्पन्न झाले. या चोरीच्या गुन्ह्यांतर्गत स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या कारवाईत गावठी कट्टा (२५ हजार रुपये), काडतूस (२ हजार रुपये), दुचाकी (१ लाख रुपये), आयफोन १४ प्रो मॅक्स (३० हजार रुपये) व आयफोन १७ (८० हजार रुपये) असा एकूण २ लाख ३७ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
कट्टा बाळगणाऱ्यास सिडकोत अटक
अंबड पोलिस ठाण्याच्या हद्दीत गावठी कट्टा बाळगत नागरिकांत दहशत निर्माण करणारा राहुल प्रकाश डोंबे यास अटक करण्यात आली. पोलिस शिपाई सागर जाधव यांना गोपनीय माहिती मिळाली होती. सिडकोतील शिवाजी चौकात एक जण गावठी कट्टा घेऊन परिसरात दहशत माजवत आहे.
नागरिकांना शिवीगाळ करून धमक्या देत असल्याने परिसरात भीती पसरली होती. वरिष्ठ पोलिस निरीक्षक जग्वेंद्रसिंग राजपूत यांनी तातडीने कारवाईचे आदेश दिले. सहायक पोलिस निरीक्षक विलास पडोळकर, हवालदार राहुल जगझाप, संदीप भुरे यांच्या पथकाने संशयितास भाजी मार्केट परिसरातून ताब्यात घेतले.