

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
शहरातील १,१८१ धोकादायक वाडे, जीर्ण इमारती आणि मोडकळीस आलेली घरे अद्यापही रिकामी झाली नसल्याने येत्या पावसाळ्यात मोठ्या दुर्घटनेचा धोका निर्माण झाला आहे. वारंवार नोटिसा देऊनही प्रतिसाद न मिळाल्याने महापालिकेने आता कठोर भूमिका घेत, अशा इमारती तत्काळ रिकाम्या करण्याचा अल्टिमेटम दिला आहे.
महापालिका आयुक्त मनीषा खत्री यांनी जाहीर नोटिसीद्वारे घरमालक व भाडेकरूंनी इमारतींचे स्ट्रक्चरल ऑडिट करून धोकादायक वास्तू स्वतःहून खाली करण्याचे आवाहन केले आहे. अन्यथा महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम २६८ अंतर्गत पोलिस बळाच्या सहाय्याने कारवाई करण्यात येईल, असा इशाराही देण्यात आला आहे.
शहरात सुमारे दीड लाखाहून अधिक मिळकती ३० वर्षांहून जुन्या असून, त्यापैकी २५ हजार १०२ मिळकती ७० वर्षपिक्षा अधिक जुन्या आहेत. काही वर्षांपूर्वी मनपाने केलेल्या सर्वेक्षणात १,१८१ वाडे व इमारती धोकादायक असल्याचे आढळले होते. त्यापैकी ४६८ इमारती अतिधोकादायक स्थितीत असून, त्यामध्ये नागरिक जीव धोक्यात घालून वास्तव्यास आहेत.
दरवर्षी पावसाळ्यापूर्वी मनपाकडून नोटिसा बजाविल्या जातात; मात्र संबंधित मालकांकडून दुर्लक्ष होत असल्याने परिस्थिती गंभीर झाली आहे. वादळी पाऊस आणि जोरदार वाऱ्यामुळे या इमारती कोसळण्याची शक्यता लक्षात घेऊन, प्रशासनाने तातडीने कारवाई सुरू केली आहे.
धोकादायक वाडे व इमारती रिकाम्या न केल्यास संबंधित मिळकतींचे वीज व पाणी कनेक्शन तोडण्याचे निर्देश देण्यात आले आहेत, तरीही प्रतिसाद न मिळाल्यास पोलिसांच्या मदतीने इमारती रिकाम्या करण्यात येणार आहेत. महापालिकेच्या या कारवाईमुळे धोकादायक इमारतींचा प्रश्न मार्गी लागणार का, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.
66 धोकादायक इमारतींमध्ये राहणाऱ्या नागरिकांनी पावसाळ्यापूर्वी स्वतःहून घरे खाली करावीत. अन्यथा कायद्यानुसार कठोर कारवाई करण्यात येईल.
-सचिन जाधव, कार्यकारी अभियंता, नगररचना