

सिडको : पुढारी वृत्तसेवा
खुटवडनगर सीटूभवन चौफुली येथे शनिवारी (दि. १८) दुपारी १२.३० च्या सुमारास डंपरची धडक बसून २३ वर्षीय युवतीचा जागीच मृत्यू झाला. पायल गोसावी (रा. खुटवडनगर) असे या युवतीचे नाव असून, ती महात्मानगर येथील कार्यालयात अकाउंटंट म्हणून कार्यरत होती. अंबड पोलिसांनी डंपरचालकाला अटक केली.
पोलिसांनी दिलेल्या ही जात माहितीनुसार, पायल खुटवडनगरहून आयटीआय सिग्नलकडे दुचाकीवरून असताना शिवशक्तीनगरकडून येणाऱ्या हायवा डंपरने (एमएच ०४, जीसी ०९८८) चौफुलीवर येताच नियंत्रण गमावले. या डंपरने प्रथम कारला जोरदार धडक दिली. कारमधील चार जण सुदैवाने बचावले, मात्र वाहनाचे मोठे नुकसान झाले.
यानंतर डंपरने बाजूने जात असलेल्या पायलच्या दुचाकीला धडक दिली. डंपरच्या चाकाखाली सापडून तिचा जागीच मृत्यू झाला. भरधाव डंपरने पुढे जात आणखी तीन दुचाकी व कारला धडक दिली. अखेर रस्त्यालगतच्या झाडाला अडकून थांबल्याने मोठा अनर्थ टळला. या अपघातात सात ते आठ जण किरकोळ जखमी झाले आहेत.
पायल ही एमबीएचे शिक्षण घेत होती. तिच्या पश्चात आई-वडील व भाऊ असा परिवार आहे. माजी नगरसेवक अॅड. तानाजी जायभावे यांनी घटनेची माहिती अंबड पोलिसांना दिली. अपघातानंतरही सुमारे एक ते दीड तास अॅम्बुलन्स आली नाही.
शिवसेना व्हीजेएनटीबीचे जिल्हाध्यक्ष ललित बाविस्कर, भाजपचे अशोक पवार, प्रशांत मेणे यांच्यासह नागरिकांनी रास्ता रोको आंदोलन करीत मृत मुलीला न्याय मिळण्याची मागणी केली. परिणामी काही काळ वाहतूक पूर्णपणे ठप्प होऊन वाहतूक कोंडी झाली होती. दरम्यान, घटनेची माहिती मिळताच अंबड पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक जग्वेद्रसिंग राजपूत यांनी फौजफाट्यासह घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली.
पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात पाठवला. याप्रकरणी अंबड पोलिसांनी गुन्हा दाखल करून डंपरचालकाला ताब्यात घेऊन अटक केली आहे. अपघाताची माहिती मिळताच आमदार सीमा हिरे यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली.
त्यांनी परिस्थितीचा आढावा घेत संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक त्या सूचना दिल्या आणि बचावकार्य अधिक वेगाने राबवण्याचे निर्देश दिले. यावेळी जिल्हा रुग्णालयात जखमींची भेट घेऊन आवश्यक ती सर्व मदत देण्याचे आश्वासन दिले.