

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
नाशिक महापालिकेची रुग्णालये व नागरी आरोग्य केंद्रांमधील आरोग्य सेवा अखंडित ठेवण्यासाठी मानधन तत्वावर कार्यरत असलेल्या ६२ डॉक्टर आणि आरोग्य कर्मचाऱ्यांना पुढील सहा महिन्यांसाठी पुनर्नियुक्ती देण्याचा प्रस्ताव स्थायी समितीच्या मंजुरीसाठी सादर करण्यात आला आहे. या मुदतवाढीसाठी एक कोटी ७७ लाख ८४ हजार रुपयांचा खर्च अपेक्षित आहे.
महापालिकेच्या पाच रुग्णालये, आठ प्रसूतिगृहे आणि ३० नागरी प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये कार्यरत असलेल्या या कर्मचाऱ्यांचा करार ९ जून २०२६ रोजी संपला होता. नियमित पदभरतीची प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत आरोग्यसेवेत कोणताही अडथळा निर्माण होऊ नये, यासाठी दोन दिवसांचा तांत्रिक खंड देऊन १२ जून ते ९ डिसेंबर २०२६ या कालावधीसाठी त्यांना पुनर्नियुक्ती देण्याचा निर्णय प्रस्तावित करण्यात आला आहे.
या प्रस्तावानुसार तज्ज्ञ वैद्यकीय अधिकारी, वैद्यकीय अधिकारी, स्टाफ नर्स, एएनएम, क्ष-किरण तंत्रज्ञ तसेच मानसशास्त्रज्ञ अशा विविध पदांवरील कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. तज्ज्ञ डॉक्टर आणि वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या मानधनासाठी एक कोटी ३४ लाख १० हजार रुपये, तर इतर आरोग्य कर्मचाऱ्यांच्या मानधनासाठी ४३ लाख ७४ हजार रुपये खर्च अपेक्षित असून हा निधी महापालिकेच्या अर्थसंकल्पातील संबंधित तरतुदीतून उपलब्ध केला जाणार आहे.
पुनर्नियुक्तीमध्ये ३ रेडिओलॉजिस्ट, २ मानसोपचार तज्ज्ञ, ७ बालरोगतज्ज्ञ, ३ भूलतज्ज्ञ, २ मानसशास्त्रज्ञ, ७ एमबीबीएस वैद्यकीय अधिकारी, २५ स्टाफ नर्स, ८ एएनएम, ५ क्ष-किरण तंत्रज्ञ यांचा समावेश आहे.
संबंधित नियुक्ती पूर्णपणे तात्पुरत्या स्वरूपाची असून, नियमित भरती पूर्ण होईपर्यंतच लागू राहील. त्यामुळे या कर्मचाऱ्यांना भविष्यात महापालिकेच्या कायम सेवेसाठी कोणताही हक्क किंवा दावा करता येणार नाही. स्थायी समितीची मंजुरी मिळाल्यानंतर या प्रस्तावाची अंमलबजावणी होणार असून, शहरातील महापालिकेच्या आरोग्य सेवांमध्ये सातत्य कायम राहण्यास मदत होणार आहे.
३६ फायरमनना मिळणार मुदतवाढ
२९९ - एकूण पदे मंजूर
२९५ - निवृत्तीनंतर पदे रिक्त
५१,४०,८०० रुपये - खर्च अपेक्षित
शहरातील पावसाळी तसेच संभाव्य आपत्कालीन परिस्थिती लक्षात घेऊन नाशिक महापालिकेच्या अग्निशमन विभागातील मानधनावरील ३६ फायरमनना आणखी सहा महिन्यांची मुदतवाढ देण्याचा प्रस्ताव स्थायी समितीसमोर सादर केला आहे. या मुदतवाढीसाठी सुमारे ५१ लाख ४० हजार ८०० रुपये खर्च अपेक्षित आहे.
महापालिकेच्या अग्निशमन विभागात फायरमनची एकूण २९९ पदे मंजूर असून, निवृत्तीनंतर त्यापैकी २९५ पदे रिक्त झाली आहेत. परिणामी, अवघ्या चार नियमित फायरमनच्या बळावर विभागाचा कारभार सुरू आहे. ही तूट भरून काढण्यासाठी महापालिकेने २० ऑक्टोबर २०२३ रोजीच्या ठरावानुसार ३६ फायरमन मानधन तत्त्वावर नियुक्त केले होते.
शासनाने महापालिकेच्या यांत्रिकी, वैद्यकीय आणि अग्निशमन विभागातील पदे नियमित भरतीने भरण्यास परवानगी दिल्यानंतर टीसीएसमार्फत १८४ फायरमन व वाहनचालकांच्या भरतीची प्रक्रिया सुरू आहे.
मात्र ही प्रक्रिया अद्याप पूर्ण झालेली नाही. त्यातच मानधनावरील ३६ फायरमनची सेवा मुदत संपली आहे, त्यामुळे भरती प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत त्यांना आणखी सहा महिने सेवेत कायम ठेवण्याचा प्रस्ताव अग्निशमन विभागाने सादर केला आहे.
सध्या पावसाळा सुरू असून, शहरात सिंहस्थ कुंभमेळ्याच्या विविध विकासकामांना वेग आला आहे. तसेच गोदावरी नदीला पूर आल्यास आपत्कालीन परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता लक्षात घेता अग्निशमन विभागाकडे पुरेसे मनुष्यबळ असणे आवश्यक आहे. या पार्श्वभूमीवर ३६ मानधनावरील फायरमनना मुदतवाढीची शिफारस केली असून, स्थायी समितीच्या मंजुरीनंतर त्यांना मोठा दिलासा मिळण्याची शक्यता आहे.