नाशिक : महानगरपालिकेच्या निवडणूक रणसंग्रामाला सुरूवात झाली असून, पहिल्याच दिवशी उमेदवारी अर्ज खरेदीसाठी इच्छूकांची अक्षरश: झुंबड उडाल्याचे चित्र निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या कार्यालयांमध्ये दिसून आले. पहिल्या दिवशी मंगळवारी (दि. २३) तब्बल १ हजार ७६३ उमेदवारी अर्जांची विक्री झाली असून प्रभाग ३ मधून शिवसेना शिंदे गटाकडून माजी नगरसेविका पूनम मोगरे यांनी उमेदवारी अर्ज दाखल करत खाते खोलले आहे.
महापालिकेसाठी येत्या १५ जानेवारी रोजी निवडणूक होत आहे. या निवडणुकीसाठी मंगळवार (दि. २३) पासून उमेदवारी अर्ज वाटप व दाखल करण्यास सुरूवात झाली. या निवडणुकीसाठी महापालिका क्षेत्रातील ३१ प्रभागांकरीता दहा निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली असून, प्रत्येक निवडणूक निर्णय अधिकाऱ्याकडे साधारणत: तीन प्रभागांची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.
या निवडणूक अधिकाऱ्यांकडे संबंधित प्रभागातील उमेदवारांना आपले अर्ज दाखल करता येणार आहेत. त्यासाठी आवश्यक निवडणूक कर्मचारीवर्गही उपलब्ध करून देण्यात आले आहेत. ३० डिसेंबरपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करता येणार आहे. २ जानेवारीला उमेवारी अर्ज माघारीची मुदत असणार आहे. महापालिका निवडणुकीसाठी सुमारे अडीच हजारांहून अधिक इच्छूक उमेदवार गुडघ्याला बाशींग बांधून तयार आहेत. भाजपकडे सर्वाधिक १०६७ इच्छूक आहेत. शिवसेना (शिंदे गटा) कडे ३५०, राष्ट्रवादी अजित पवार गटाकडे २२५, शिवसेना उबाठाकडे २५०, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाकडे २४२, काँग्रेसकडे २५० तर इतर पक्ष व अपक्ष असे ४२५ जण निवडणूक लढविण्यास इच्छूक आहेत. उमेदवारी अर्ज वाटपाच्या पहिल्या दिवशी अर्ज खरेदीसाठी गर्दी झाल्याचे चित्र होते.
प्रभाग १४ साठी सर्वाधिक १४२ अर्ज
उमेदवारी अर्ज वाटप व दाखल करण्याच्या पहिल्या दिवशी महापालिका क्षेत्रातील ३१ प्रभागांच्या तुलनेत प्रभाग १४ करीता सर्वाधिक १४२ अर्जांची विक्री झाली. त्या खालोखाल प्रभाग २९ करीता १४१, प्रभाग २७ करीता ११०, प्रभाग २५ करीता ९९ अर्जांची विक्री झाली. प्रभाग १ करीता ४९, २-४५, ३- ६०, ४-३९, ५-१३, ६-४४, ७-२२, १२-४६, २४-५९, १३-७९, १५-६५, १६-३५, २३-४४, ३०-५०, १७-५३, १८-४९, १९-४०, २०-४९,२१-४९,२२-२६, २६-६२,२८-३७, तर प्रभाग ३१करीता पहिल्या दिवशी ९५ अर्जांची विक्री झाली.
प्रभाग ३ मधून पहिला अर्ज दाखल
महापालिका निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या पहिल्या दिवशी पंचवटीतील प्रभाग क्रमांक ३ मधून शिवसेना शिंदे गटाच्या पूनम मोगरे यांनी सर्वप्रथम अर्ज दाखल करत खाते खोलले आहे. अद्याप राजकीय पक्षांची उमेदवारी जाहीर झालेली नाही. त्यामुळे इच्छूक उमेदवारी जाहीर होण्याच्या प्रतिक्षेत आहेत. उमेदवारी जाहीर झाल्यानंतर अर्ज दाखल करण्यासाठी गर्दी होणार आहे.