

नाशिक: महापालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी नाशिकरोड विभागात उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया मंगळवार (दि. २३) पासून सुरू होताच पहिल्याच दिवशी सहा प्रभागांसाठी एकूण २६६ उमेदवारी अर्जांची विक्री झाली.
दुर्गा उद्यानाजवळील महापालिकेच्या विभागीय कार्यालयात सकाळी दहा वाजेपासून अर्ज विक्रीस सुरुवात झाली. सकाळपासूनच विविध राजकीय पक्षांचे तसेच अपक्ष इच्छुक उमेदवार मोठ्या संख्येने अर्ज घेण्यासाठी कार्यालयात दाखल झाले होते. भारतीय जनता पक्ष, शिवसेना (ठाकरे गट व शिंदे गट), राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट व अजित पवार गट), महाराष्ट्र नवनिर्माण सेना, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट), वंचित बहुजन आघाडी तसेच अपक्ष उमेदवारांची मोठी गर्दी पाहायला मिळाली.
प्रभाग १७, १८, १९ तसेच २०, २१, २२ या दोन ठिकाणी अर्ज विक्री करण्यात आली. अनेक इच्छुक उमेदवारांकडून चार ते पाच अर्ज खरेदी करण्यात येत होते. मात्र अर्ज विक्रीची प्रक्रिया संथ गतीने सुरू असल्याने रांगेत उभ्या असलेल्या उमेदवारांनी नाराजी व्यक्त करत निवडणूक निर्णय अधिकारी नाईक यांच्याकडे तक्रार नोंदवली.
प्रभागनिहाय अर्ज विक्री
प्रभाग १७ मध्ये ५३, प्रभाग १८ मध्ये ४९, प्रभाग १९ मध्ये ४१, प्रभाग २० मध्ये ४९, प्रभाग २१ मध्ये ४९ तर प्रभाग २२ मध्ये २६ अर्जांची विक्री झाली.