

नाशिक : एकीकडे महायुतीवर अनिश्चिततेचे ढग गडद होत असताना, दुसरीकडे मनसे आणि ठाकरे सेनेनी आपल्या उमेदवारांची यादी निश्चित करीत 'आघाडी' घेतली आहे. मंगळवारी (दि.२३) दोन्ही सेनेच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची मनसेच्या राजगड कार्यालयात बैठक पार पडली. बैठकीत ३१ प्रभागांचा आढावा घेण्यात आला. तसेच प्रमुख आणि सक्षम उमेदवारांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आला असून, वंचित आणि रासपला काही जागा सोडण्यात आल्याचीही माहिती समोर येत आहे.
मुंबईमध्ये ठाकरे बंधू एकत्र येणार असले तरी, त्यावर अधिकृत घोषणेनंतरच शिक्कामोर्तब होणार आहे. मात्र, नाशिकमध्ये दोन्ही ठाकरे सेना एकत्र लढणार असल्याचे यापूर्वीच स्पष्ट करण्यात आले आहे. त्यानुसार दोन्ही सेनेच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांकडून जागा वाटपाचा फॉर्म्युला, तसेच उमेदवारांच्या नावांवर मागील काही दिवसांपासून मंथन केले जात आहे. दोन्ही सेनेकडून इच्छुकांच्या मुलाखती घेण्यात आल्या असल्या तरी, 'सक्षम उमेदवार' हे एकमेव सूत्र उमेदवारीसाठी निश्चित करण्यात आले आहे. त्यानुसार, ३१ पैकी ज्या प्रभागात दोन्ही सेनेची ताकद आहे, त्याठिकाणी उमेदवारांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आल्याची माहिती समोर येत आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, 'समसमान' या तत्वानुसार दाेन्ही सेनेत जागा वाटप करण्यात आले आहे. उमेदवारांची नावे निश्चित करण्यात आली असली तरी, नावे बंद लिफाफ्यात असल्याने उमेदवारीची माळ नेमकी कोणाच्या गळ्यात टाकली आहे, याबाबतचा सस्पेन्स कायम आहे. उमेदवारांच्या नावांची यादी लवकरच पक्षातील वरिष्ठांकडे पाठविली जाणार आहे. वरिष्ठांनी यादीवर शिक्कामोर्तब केल्यानंतर अधिकृतपणे ती जाहीर केली जाणार आहे.
दरम्यान, भाजप, शिंदे सेना, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट यांच्यातील महायुतीचे चित्र दिवसेंदिवस धुसर होत असताना, दोन्ही ठाकरे सेनेनी आघाडीबरोबरच जागा वाटप आणि उमेदवारांची यादी निश्चित करून आघाडी घेतली आहे. पुढील काही दिवसातच यादी जाहीर केली जाणार असून, संभाव्य उमेदवारांना स्थानिक पदाधिकाऱ्यांनी कामाला लागण्याचे आदेश दिले आहेत. मनसेचे प्रदेश सरचिटणीस दिनकर पाटील, ठाकरे सेनेचे सहसंपर्क नेते दत्ता गायकवाड, जिल्हाध्यक्ष डी. जी. सूर्यवंशी मनसेचे प्रदेश उपाध्यक्ष सलीम शेख, रतनकुमार इचम, उपजिल्हाध्यक्ष मनोज घोडके, मनसे महिला जिल्हाध्यक्ष वैशाली पोतदार, शहराध्यक्ष शैला शिरसाट आदींच्या प्रमुख उपस्थितीत उमेदवारांची यादी निश्चित करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
महाविकास आघाडी फुटली?
नाशिक महापालिका निवडणुकीसाठी दोन्ही ठाकरे सेनेनी एकत्र आल्याचे जाहीर करताना महाविकास आघाडीतील काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाला देखील सोबत घेणार असल्याचे सांगितले होते. महाविकास आघाडीतील या सर्व पक्षांच्या स्थानिक प्रमुख पदाधिकाऱ्यांमध्ये बैठकाही पार पडल्या. मात्र, मागील काही दिवसांपासून केवळ दोन्ही सेनेच्या पदाधिकाऱ्यांमध्येच आघाडीच्या चर्चा घडत असून, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे पदाधिकारी कुठेही दिसून येत नाहीत. त्यामुळे नाशिकमध्ये महाविकास आघाडी फुटली तर नाही ना? अशी चर्चा आता रंगत आहे. दरम्यान, दोन्ही सेनेनी वंचित आणि रासपला सोबत घेण्यासाठी त्यांच्याकरिता काही जागा सोडल्या असल्याची माहिती समोर येत आहे.