Nashik Water Problem | नदीजोड प्रकल्प योजनांच्या मंजुरीने पाणीप्रश्न मार्गी
नाशिक : पुढारी वृत्तसेवा
उपसा नाशिक, अहिल्यानगर आणि मराठवाड्यासाठी दोन नदीजोड योजनांना मंजुरी देण्यात आली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनात यासंदर्भात घोषणा केली. यामुळे गोदावरी खोऱ्यात पाणी वळवून दुष्काळग्रस्त भागातील शेतीसाठी पाणी उपलब्ध होणार आहे.
भविष्यातील पाणीपुरवठ्याचे नियोजन करणे सोयीचे ठरणार आहे. या योजनांच्या मंजुरीसाठी आमदार प्रा. देवयानी फरांदे यांनी विशेष पाठपुरावा केला. आमदार प्रा. फरांदे यांनी जिल्ह्यासह उत्तर महाराष्ट्रातील जलसमस्येवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी महत्त्वाकांक्षी नदीजोड प्रकल्पांसाठी सातत्याने पाठपुरावा केला.
या प्रकल्पांमुळे विशेषतः दुष्काळी भागाला पाणी मिळणार आहे. गोदावरी खोऱ्यातील पाण्याची गरज पूर्ण होईल. या योजनांत दमणगंगा एकदरे -गोदावरी उपसा नदीजोड योजना, दमणगंगा-वैतरणा-गोदावरी (कडवा-देवनदी) उपसा नदीजोड योजनांना मंजुरी देण्यात आली. दमणगंगा योजनेसाठी २,२१३ कोटी रुपये व दमणगंगा-वैतरणा-गोदावरी योजनेसाठी १३,४९७ कोटी रुपयांना प्रशासकीय मान्यता देण्यात आल्याची घोषणा मुख्यमंत्री फडणवीस यांनी केली. यामुळे नाशिकचा शेती आणि पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटण्यास मोठी मदत होणार आहे.
असा होणार फायदा
योजनेद्वारे नार-पार, दमणगंगा, वैतरणा व उल्हास नदी उपखोऱ्यातील २.७२ टीएमसी पाणीवापराच्या वळण योजना, दमणगंगा-एकदरे-गोदावरी प्रकल्पाद्वारे ३.३९ टीएमसी व दमणगंगा-वैतरणा-गोदावरी योजनेद्वारे ४.६८ टीएमसी पाणी गोदावरी खोऱ्यात वळवण्यात येईल. यामुळे दमणगंगा (एकदरे) योजनेत १३,१६४ हेक्टर आणि दमणगंगा-वैतरणा-गोदावरी योजनेत ३३,११० हेक्टर क्षेत्राला फायदा होणार आहे.
या योजनांना मंजुरी
वैनगंगा नळगंगा नदीजोड योजना - ९४,९८६ कोटी दमणगंगा वैतरणा गोदावरी नदीजोड - १३,४९७ कोटी नार-पार गिरणा नदीजोड प्रकल्प - ७,४६५ कोटी दमणगंगा एकदरे गोदावरी नदीजोड प्रकल्प - २२१३ कोटी

