

नाशिक : महापालिका निवडणुकीसाठी विविध शासकीय, निमशासकीय कर्मचारी तसेच शाळा-महाविद्यालयांतील शिक्षक, शिक्षकेतर अशा दहा हजार कर्मचारी, अधिकाऱ्यांना नियुक्ती पत्र प्रदान करण्यात आली आहेत. नियुक्तीस टाळाटाळ करणाऱ्या अधिकारी कर्मचाऱ्यांवर शिस्तभंगासह फौजदारीची कारवाई करण्यात येईल, असा इशारा निवडणूक प्राधिकृत अधिकारी तथा प्रशासन उपायुक्त लक्ष्मीकांत साताळकर यांनी दिला आहे.
नाशिक महापालिका निवडणुकीसाठी येत्या १५ जानेवारीला मतदान होत आहे. दुसऱ्याच दिवशी १६ जानेवारीला मतमोजणीद्वारे निवडणुकीचा निकाल जाहीर केला जाणार आहे. या निवडणुकीसाठी १५६८ मतदान केंद्रे उभारली जाणार आहेत. यासाठी २०४६ टीम तयार करण्यात आल्या आहेत. प्रत्येक मतदान केंद्रावर पाच ते सहा कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली जाणार आहे.
यासाठी सुमारे आठ हजार कर्मचाऱ्यांसह दोन हजार अधिकारी वर्गही लागणार आहे. या कर्मचाऱ्याच्या उपलब्धतेसाठी जिल्ह्यातील शासकीय कार्यालये, निमशासकीय कार्यालये, शाळा, महाविद्यालये असे जवळपास ४५० विभाग आणि संस्थांना पत्र लिहून कर्मचारी १० हजार अधिकारी व कर्मचारी यांना नियुक्तीपत्रे देण्यात आली आहे. परंतु,काही अधिकारी व कर्मचाऱ्यांकडून निवडणूक कर्तव्यावर येण्यासाठी टाळाटाळ केली जात आहे. त्यामुळे निवडणूक विभागाने आक्रमक पवित्रा घेतला असून निवडणूकीच्या कर्तव्यात कसूर केल्यास किंवा गैरहजर राहिल्यास संबधितांविरोधात राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसा शिस्तभंगाची कारवाई करण्यासह फौजदारी गुन्हा दाखल केला जाईल असा इशारा प्रशासन उपायुक्त साताळकर यांनी दिला आहे.
निवडणूक प्रशिक्षण
महापालिका निवडणुकीसाठी नियुक्त केल्या जाणाऱ्या अधिकारी कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण दिले जाणार आहे. २८ डिसेंबरला व १ जानेवारीला पहिल्या टप्प्यात तर १० व ११ जानेवारीला अंतिम टप्प्यातील प्रशिक्षण कर्मचाऱ्यांना दिले जाणार आहे. यासाठी पंचवटीतील भोर सभागृह, मुंबई नाका येथील दादासाहेब गायकवाड सभागृह तसेच महाकवी कालिदास कलामंदिर येथे हे प्रशिक्षण कार्यक्रम होणार आहेत.